ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष तीव्र होत चालला आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झालेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना जाहीर धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.
शिवसेनेच्या बंडखोरीत शिंदे गटात सामील झालेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत एका जाहीर सभेत जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) माधव पावडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या धमकीवजा वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली होती. अखेर या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून माधव पावडे यांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध संशय अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशीसाठी पावडे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर नांदेडच्या वामनराव पावडे मंगल कार्यालयात शिवसेना (ठाकरे गट) मेळाव्यात दि.१९ मे रोजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी जाहीर धमकी दिली होती. माधव पावडे यांनी “आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस संरक्षण काढून रस्त्यावर फिरून दाखवावे जिथे भेटला तिथे हाणल्याशिवाय सोडणार नाही” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच आमदार कल्याणकर यांनी कुठे कुठे जमिनी घेतल्यात याबाबतही वक्तव्य केले होते. हे वक्तव्य आमदार बालाजी कल्याणकर यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले.
यावर शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी रविवार दिनांक 21 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेऊन माधव पावडे यांना जाहीर प्रतिआव्हान दिले होते. तसेच या प्रकरणाची तक्रार गणेश शिंदे यांच्यातर्फे भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. त्यानंतर माधव पावडे यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी माधव पावडे यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. एकंदरच पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांना भिडल्याचे दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻