Thursday, December 26, 2024

कधी नव्हे इतकी चुरशीची ठरली नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक! भाजपाला अति आत्मविश्वास नडला, काँग्रेसचेही तेच! प्रा. रविंद्र चव्हाण अवघ्या १४५७ मतांनी विजय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• रविंद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 तर डॉ. संतुकराव हंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331

नांदेड – काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेवर झालेली पोटनिवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपाला अति आत्मविश्वास नडला, असल्याचे दिसून येते. काँग्रेसचेही तेच झाले, पण त्यांना निसटता का होईना विजय मिळाला आणि प्रा. रवींद्र चव्हाण अवघ्या १४५७ मतांनी खासदार झाले.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे पुत्र रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे.

मागच्यावेळी ५९ हजार ४४२ चे मताधिक्य
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात लढत होती. त्यात वसंतराव चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 25 वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. गेल्यावेळी 61 टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत 67.81 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली. रविंद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 मते मिळाली तर डॉ. संतुकराव हंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ भोसीकर यांना 80 हजार 179 मते मिळाली.

निकालावरून संभ्रम: फेरमतमोजणी नाही
दरम्यान पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ईव्हीएम मतासोबतच पोस्टल मतेही निर्णायक ठरली. या पोटनिवडणुकीची फेरमतमोजणी झाल्याची बाहेर चर्चा होती. मात्र कुठलीही फेरमतमोजणी झाली नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या 27 फेऱ्या व पोस्टल मतांची मोजणी याद्वारे पुर्णता पारदर्शक पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाला जाहीर करण्यात आला. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांचे सनियंत्रण होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत फेरीनिहाय मिळालेल्या मतांची संख्या घोषित करण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्याकडील अधिकृत नसलेली आकडेवारी बाहेर सांगितली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मात्र पारदर्शी पद्धतीने पूर्ण कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशसनाने स्पष्ट केले आहे.

अति आत्मविश्वास
या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला अति आत्मविश्वास नडल्याचे दिसून येत आहे. 2019 च्या निवडणुकीत नांदेड लोकसभेची जागा भाजपने जिंकली होती, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चांगल्या मताधिक्याने या जागेवर विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावली. त्यानंतर आता झालेल्या या पोटनिवडणुकीत एकंदर वातावरण आणि राजकीय स्थिती पाहता भाजपाला ही जागा पुन्हा मिळवता येईल असेच काहीसे चित्र सुरुवातीपासून निर्माण झाले होते. मात्र भाजपने ती संधी गमावल्याचे दिसून येत आहे. प्रमुख नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि त्याचबरोबर नेत्यांनी बाळगलेली विजयाची अति खात्री भाजपाला नडल्याचे निकालावरून दिसून येत आहे. काँग्रेसच्या बाबतीतही असाच काहीसा अति आत्मविश्वास बाळगला गेला. परिणामी मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. पण त्यांना निसटता का होईना विजय मिळाला. भाजपने मागच्या निवडणुकीत ही जागा गमावल्याने आता भाजप पुन्हा या जागेवर जिंकून येऊच शकणार नाही; त्याचबरोबर खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती यावरच काँग्रेसचे नेते विसंबून होते असे एकंदर चित्र निवडणुकीदरम्यान दिसत होते. परिणामी या फाजील आत्मविश्वासामुळे काँग्रेसचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. पण अखेर अल्पशा मताने का होईना काँग्रेसला ही जागा स्वतःकडे राखता आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!