Tuesday, January 14, 2025

गोरक्षकांना पोलीस ठाण्यात अर्धनग्न करून मारहाण प्रकरण, अखेर पोलीस अधिकाऱ्यास करण्यात आले निलंबित; इस्लापूर पोलीस ठाण्यातील प्रकार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

व्हिडिओ👇🏻

किनवट (जि. नांदेड)- गोरक्षक युवकांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत इस्लापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवारी दि.१२ रात्री उशिरा निलंबित केले. 

शिवणी येथील गोरक्षकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने इस्लापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे केली होती. या एकूणच घटनेची आणि मागणीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी शनिवारी दि. ११ रोजी रात्री कथित मारहाणीची चौकशी करण्याचे आदेश कंधारचे डीवायएसपी मारुती थोरात यांना दिले होते. त्यानंतर रविवारी दुपारी पोलीस अधीक्षकांनी आधी इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे यांना या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत पोलीस नियंत्रण कक्षात संलग्न होण्याचे आदेश जारी केले.

रविवारी सायंकाळी चौकशी अधिकारी मारुती थोरात व किनवटचे डीवायएसपी विजय डोंगरे यांनी शिवणी येथे जाऊन पीडित युवकांसह इतरांचा जाब- जबाब घेतला. भोकरचे अपर पोलीस अधीक्षक अप्पाराव धरणे यांनीही रविवारी इस्लापूर ठाण्याला भेट दिली. त्यावेळी विहिंपचे गजानन चाहेल यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरणे यांची भेट घेऊन मारहाणप्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी इस्लापूरचे ठाणेदार रघुनाथ शेवाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकात ठाणेदाराकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्याकडे देण्यात आली असून चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हीडिओ नांदेड जिल्ह्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर व्हीडिओ हा नांदेड जिल्ह्यातील इस्लापुर येथील पोलीस ठाण्यामधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यात इस्लापुर पोलिसांकडून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला जात असल्याचे व्हीडिओत दिसत आहे. सदरील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी किनवट तालुक्यतील झळकवाडी व ताल्हारी या गावातील गोवंश घेऊन अवैधरित्या कत्तल खाण्यात जाणारा ट्रक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एक फेब्रुवारी 2023 रोजी अडवले होते. ज्या वाहनात सदर गोवंश आढळले त्या वाहनचालकावर गोवंश तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण ह्या घटनेत स्थानिक पोलिसांनी बरेच आढेवेढे घेत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवणी यात्रेत वाद झाले. त्यावरून पाच फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता इस्लापुर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि जुना राग मनात धरून ह्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

दरम्यान ज्या गावातून हे गोवंश अवैधरित्या वाहतूक केल्या जात होते, त्या गावातील गावकऱ्यांसमक्ष ह्या कार्यकर्त्याना गुरा ढोराप्रमाणे मारहाण केली गेली व त्याच दिवशी कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले. या घटनेविषयी ८ फेब्रुवारी रोजी सदर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याविषयी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना तक्रार देण्यात आली होती. ज्यात पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते, पण कोणताही गुन्हा अद्याप झाला नव्हता. याउलट विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यानाच १४९ च्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान याविषयी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ह्या विषयीची तक्रार गृहमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे करण्यात आली होती.

या प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे यांनी लक्ष घातले आणि अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!