Sunday, December 22, 2024

जिल्हा परिषद शाळेत रात्री आणि भल्या पहाटेही सुरू असतो विद्यार्थ्यांचा अभ्यास; शिक्षक करतात शाळेतच मुक्काम

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांचा प्रेरणादायी उपक्रम

रात्री शाळेतच जेवतात विद्यार्थी आणि गुरुजी

मालेगाव (जि. नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, मालेगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी रात्रीच्या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली असून ही तयारी 2 मार्च ते 14 मार्च या दरम्यान शाळेमध्ये निवासी पद्धतीने राबविण्याचा संकल्प प्रशालेतील उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केला आहे.

स्वतः शिक्षक शिवा कांबळे शाळेमध्ये रात्रीच्या वेळी मुक्कामाला असून आपला पूर्ण वेळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी देत आहेत. त्यांनी मागील दोन वर्षांपासून 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी अशा अठ्ठावीस दिवसांचा रात्रीचा अभ्यास वर्ग सुरू केला होता.

दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शाळेत त्यांचा रात्रीचा वर्ग बंद होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन उपलब्ध होत नव्हते. नेमकी ही अडचण लक्षात घेऊन शिवा कांबळे यांनी मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतः रात्री मुक्काम करून विद्यार्थ्याची पूर्वतयारी करून घेण्याचा निश्चय केला व त्यानुसार नियोजन करून हा शैक्षणिक उपक्रम त्यांनी अत्यंत निष्ठापूर्वक चालू ठेवला आहे.

आता कोरोनाचे संकट कमी होत असल्याने, विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर वेळापत्रक तयार करून त्यानुसार सायंकाळी चार ते रात्री साडे अकरापर्यंत आणि पहाटे चार ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीचा अभ्यास वर्ग सुरू आहे. विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी गेल्या तीन वर्षांपासूनचा शिवा कांबळे यांचा प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक काम करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.

रात्रीच्या या अभ्यास वर्गास विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद आहे. या रात्रीच्या अभ्यास वर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली असून या रात्रीच्या वर्गासाठी इयत्ता दहावीतील मुली सुद्धा शाळा संपल्यानंतर सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत शाळेत अभ्यास करतात. सात नंतर मुली घरी जातात आणि इतर सर्व विद्यार्थी शाळेतच अभ्यास करत असतात. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी सर्व उपस्थित विद्यार्थी शाळेतच जेवण करतात. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या जेवणाचा डबा पालक शाळेत आणून देतात.

आधी शिवा कांबळे यांचाही खानावळीतून डबा यायचा. परंतु, आता मालेगावचे ज्येष्ठ नागरिक आणि वृक्षमित्र फाऊंडेशनचे सदस्य ईश्वर पाटील इंगोले हे सामाजिक बांधिलकी जपत शिवा कांबळे यांना आपल्या घरचा डबा देऊन त्यांच्या कार्यास एकप्रकारे हातभार लावत आहेत. विद्यार्थ्यांसोबत रात्री साडे आठ ते नऊ या वेळेत ते जेवण करतात. जेवणानंतर लगेच रात्रीच्या अभ्यास वर्गाला सुरुवात होते.

या धावपळीच्या युगात आज आपला वैयक्तिक एक मिनिट सुद्धा कोणी कोणाला द्यायला तयार नाही. परंतु आपला वैयक्तिक वेळ देऊन शिवा कांबळे हे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहेत. विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या या साने गुरुजींच्या स्वप्नातील खऱ्याखुऱ्या समाज शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष बाब म्हणजे, शिवा कांबळे यांना अर्धांगवायूचा आजार असतानाही ते आपले हर कार्य पूर्ण मेहनतीने करीत आहेत.

तीन तज्ज्ञ करतात मार्गदर्शन
रविवारी तीन विषयाच्या सराव चाचणी परीक्षा घेण्यात येतात. रविवारी सकाळी दहा वाजता पासून दोन वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार तीन विषयाचे तीन तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतात.

हा समर्पणाचा भाग
“शाळेच्या वेळेत काम करणे हा कर्तव्याचा भाग असून शाळेच्या वेळेनंतर शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी वेळ देणे हा समर्पणाचा भाग आहे अशी माझी धारणा असून हे काम करत असताना मला प्रचंड आनंद मिळतो. आज पर्यंत मी शाळेत आणि शाळेच्या वेळे व्यतिरिक्त अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत आणि करीत राहणार आहे.

शिवा कांबळे
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, जि.प.हा. मालेगाव


विद्यार्थी समाधानी

घरी अभ्यासाचे वातावरण नाही, भावंडाचा गोंधळ, घरातील लहान मोठी कामे करावी लागतात. यामुळे अभ्यासात लक्ष लागायचे नाही. सलग अर्धा तासही आम्ही एका जागी बसून अभ्यास करू शकत नव्हतो. परंतु कांबळे सरांनी आमच्यासाठी हे रात्रीच्या वर्गाचे नियोजन केल्यामुळे आता आम्ही चार -चार  तास सरांसोबत अभ्यास करीत आहोत. आम्हाला या रात्रीच्या वर्गाचा खूप फायदा होत आहे.
◆ प्रीती हनुमंते
इयत्ता दहावी
रात्रीचा अभ्यास वर्ग करणारी विद्यार्थिनी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!