ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरातील सराफा भागात जुन्या वादातून तलवारीचे सपासप वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना सोमवार दि. सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दोन भावांवर झालेल्या या हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला असून सागर यादव असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर यादव आणि आरोपी यांच्यात जुना वाद होता. काही दिवसांपूर्वी हा वाद मिटलाही होता; मात्र सोमवारी वाद पुन्हा उफाळून आला. त्यातूनच सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास सराफा भागात सागर यादव आणि भाऊ भानू यादव या दोन भावांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले. यात सागर यादवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच इतवारा पोलिस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
इतवारा येथील जुगार अड्ड्यामध्ये सागर यादव रा. नावघाट, नांदेड आणि केशव पवार रा. शनिमंदिरजवळ, नांदेड यांच्यात सोमवारी दुपारच्या सुमारास भांडण झाले होते. याच वादाच्या कारणावरून सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास झालेल्या हाणामारीत केशव पवारने आपल्या साथीदारांसह तलवारीने सागर यादवच्या डोक्यावर वार केले. तसेच सागरचा भाऊ भानू यादव याच्यावरही तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात सागर यादव रक्ताच्या थारोळ्यात पडला. जखमी भानू यादववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्यासह पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. तपास इतवारा पोलीस करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻