ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. दुपारी नांदेड ग्रामीणचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी नांदेडचे आणखी एक जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनेही 2 जिल्हाप्रमुखांसह 4 तालुकाप्रमुख, एका शहरप्रमुखाची हकालपट्टी केल्याचे पत्रक काढले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नांदेड ग्रामीणचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम, शहरप्रमुख तुलजेश यादव, आकाश रेड्डी, संतोष कपाटे, अमोल पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. आज रात्री त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार होता. परंतु मुख्यमंत्री उद्या सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी येत असल्याने या सर्वांचा त्यांच्या उपस्थितीत उद्या प्रवेश होणार आहे. यामुळे शिवसेनेला जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. जिल्ह्यातील अजूनही काही पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज शिवसेनेचे आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे या दोन जिल्हाप्रमुखांसह अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन राजीनामे देत खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे आज रविवारी नांदेड शहरात दाखल झाले. त्यानंतर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांची भेट घेत शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. राजीनामे देणाऱ्यांमध्ये नांदेड दक्षिणचे तालुकाप्रमुख उद्धव शिंदे, शहरप्रमुख तुलजेश यादव, उपशहरप्रमुख प्रकाश जोंधळे, उपशहरप्रमुख विजय यादव, विभागप्रमुख राहुल टाक यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
👆🏻 2 जिल्हाप्रमुख, 4 तालुकाप्रमुख, एका शहरप्रमुखाची हकालपट्टी
जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने 2जिल्हाप्रमुखांसह 4 तालुकाप्रमुख आणि एका शहरप्रमुखाची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. शिवसेनेनेही या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करीत सचिव विनायक राऊत यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे पत्रक काढले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻