ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नांदेड जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी नागपूरला बदली होऊन जात आहेत. देगलूर येथे कार्यरत आयएएस अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली झाली आहे. सौम्या शर्मा यांच्या नागपूर येथे झालेल्या बदलीनंतर नांदेडहून नागपूरला बदली होण्याचा जणू एक ट्रेंडच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने आज सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आयएएस अधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली झाली आहे. त्यांच्या नागपूर येथे झालेल्या या बदलीमुळे नांदेडहून एकामागून एक अधिकारी नागपूरला बदलून जात असल्याच्या योगायोगाची बाब चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वीच नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यानंतर नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची नागपूर विभागीय आयुक्तालयात उपायुक्त पदावर बदली झाली. तत्पूर्वी नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची नांदेडहून नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली होती. त्यानंतर आता देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली झाली आहे.
नांदेडहून नागपूरला बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली झालेली असली नांदेड टू नागपूर अशी होणाऱ्या या बदल्यांच्या योगायोगाची चांगलीच चर्चा नांदेडमध्ये होत आहे.
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या १२ ऑक्टोबरला बदल्या झाल्या. त्यानंतर ३५ दिवसानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. त्यात आता आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप हे बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे.
अधिकारी आणि बदल्या झालेले ठिकाण?
०१. श्रीमती भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
०२. व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
०३. श्रीमती सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर, जि.नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
०४. एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.
०५. एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.
०६. तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली – नियुक्ती प्रतीक्षाधीन
०७. विनय सदाशिव मून, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी जि.प.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻