ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• शहरात अनेक सखलवस्त्यात शिरले पाणी, शेतीचेही मोठे नुकसान
नांदेड – जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा हवालदील झाला आहे. दूध, पेपर विक्रेते तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, शहरातील तीन पुलं पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून पावसामुळे देवगिरी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नांदेड शहरात सर्वत्र पावसाने नागरिकांची दाणादाण उडविली आहे. अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. गोदावरी, पैनगंगा, आसना, मन्याड, लेंडी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या लोकांना तसेच गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्वच नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक सतत सुरू आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडून एक लाख 46 हजार 447 क्यूमेक्स पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी भरून वाहत आहे. गोदावरी नदी काठावर शहरातील अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत.
एवढेच नाही तर शहरातील तीन पुलं पूर्णपणे पाण्याखाली आले आहेत. यात हिंगोली गेट येथील अंडरब्रिज कालपासूनच पाण्याखाली आहे. त्याचबरोबर लालवाडी येथील अंडरब्रिजही पाण्याखाली गेला आहे. तर जुने नांदेड ते सिडकोला जोडणारा नावघाट पूलही आज पाण्याखाली गेला आहे. याठिकाणी इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे तसेच महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन बॅरिकेटिंग केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात झाला आहे.
जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक आणि बस वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. शहरातील विष्णूनगर, गोकुळनगर, वसंतनगर, हमालपुरा, इस्लामपुरा, खडकपुरा, सैलाबनगर, शक्तीनगर या सकल भागामध्ये तसेच श्रावस्तीनगरचा काही भाग, भीमसंदेश कॉलनी, तरोडा भागातील काही भाग, देगलूर नाका परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यात महावीर चौक, श्रीनगर, बाबानगर, आनंदनगर, अण्णाभाऊ साठे चौक या रस्त्यावरून पाणी पाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर तिकडे हिंगोली गेट अंडरब्रिजप्रमाणेच लालवाडी अंडरब्रिजही पूर्ण पाण्याखाली आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
पैनगंगा नदीला पूर आल्याने विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. नांदेड ते मुदखेड गाडेगाव मार्गे जाणारा रस्ता सीता नदीला पूर आल्याने वाहतुकीसाठी बंद केला आहे. एकंदरीत जिल्ह्यात व शहरात पावसाने हा हाहाकार माजविला आहे. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर काही भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या स्वतः आपल्या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात कुठेही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. मात्र शेतकऱ्यांची अनेक जनावरे या पावसामध्ये मरण पावली आहेत.
शेतातील सोयाबीन, तूर, मूग तसेच बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाची सध्याची स्थिती
शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. हवामान अंदाज, प्रकल्पातील सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठा व प्रकल्पात होणारी आवक या सर्व बाबी लक्षात घेता, सद्यस्थितीमध्ये 11 दरवाजे उघडले असून एकूण 146447 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला असून पाण्याची आवक बघता विसर्ग साधारण 200000 क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदावरी नदीपात्रामधील नांदेड जुना पूल येथील नोंदीनुसार 351.00 मी. ही इशारा पातळी असून सध्याला 349.90 मी. पर्यंत पाणीपातळीमध्ये वाढ झालेली आहे. धरणातून विसर्ग वाढल्यास धोका पातळी 354.00 मी. पर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जावू नये, वाहने किंवा जनावरे पाळीव प्राणी, अशी कोणतीही जिवीत अथवा वत्तिहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्याबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रायनपाडू रेल्वे स्थानकावरील पावसामुळे काही रेल्वे रद्द
रायनपाडू रेल्वे स्थानकावरील पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचालनावर परिणाम झाला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आल्या आहेत ते पुढील प्रमाणे
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी संख्या 17057 मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 20810 नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी तिरुपती येथून सुटणारी गाडी संख्या 17405 तिरुपती- आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17406 आदिलाबाद-तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी काकिनाडा येथून सुटणारी गाडी संख्या 17206 काकिनाडा- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी साईनगर शिर्डी येथून सुटणारी गाडी संख्या 17205 साईनगर शिर्डी – काकिनाडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻