Saturday, December 21, 2024

पिण्याचे पाणी मागितल्यावरून किनवटमध्ये दोन खून; फावड्याचे घाव घालून मिस्त्रीसह महिलेला मारले, जमावाकडून तोडफोड

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड) – पिण्याचे पाणी मागितल्याच्या कारणावरुन अंबाडी येथील एका मनोरुग्णाने मिस्त्री काम करणाऱ्या किनवट येथील युवकाच्या डोक्यात फावडा घालून त्याची हत्या केली. या हत्येनंतर त्याने पुन्हा तोच फावडा एका महिलेच्या डोक्यात घातला.मिस्त्रीच्या हत्येनंतर किनवटमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.संतप्त युवकांनी नारेबाजी करीत बळजबरी अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद पाडली.वाहनांची तोडफोड,दगडफेक होत असताना अपुऱ्या यंत्रणेमुळे पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

किनवटच्या इस्लामपुरा येथील युवक वसीम महेबुब कुरेशी (वय २९) हा मिस्त्री काम करत होता. बुधवारी सकाळी वसीम हा शेख अजीम, शेख शोएब, शेख बाबा, शेख जहीर कुरेशी यांच्यासोबत मिस्त्री काम करण्यासाठी अंबाडी येथे गेला होता. वसीम हा अंबाडी येथील उत्तम भरणे याच्या घराचे लेंटरचे काम करीत होता. तर त्याचे सहकारी अन्य एका घरी काम करीत होते. बुधवारी दुपारी वसीम कुरेशी व त्याच्या सहकाऱ्यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर वसीम हा पुन्हा उत्तम भरणे याच्या घरी कामासाठी आला. तहान लागल्याने त्याने दुपारी पावणेचारच्या दरम्यान उत्तम भरणे याला पिण्याचे पाणी मागितले. तेव्हा तु मला पाणी का मागितले, या कारणावरून मनोरुग्ण असलेल्या उत्तमने वसीमच्या डोक्यात, तोंडावर फावड्याचे घाव घालून त्याला रक्तबंबाळ केले.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वसीमचा मृत्यू झाला. त्याचवेळी उत्तम याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या विशाखा मुनेश्वर यांच्या घरी जावून त्यांच्याही डोक्यात फावड्याने वार केले. या घटनेनंतर वसीम कुरेशी व विशाखा मुनेश्वर यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी वसीम याला मृत घोषित केले तर विशाखा यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना आदिलाबादला हलविले. दरम्यान, वसीम कुरेशी याचा खून झाल्याची बातमी किनवट, गोकुंद्यात पसरताच सायं.६ च्या दरम्यान १८ ते २५ वयोगटातील युवकांसह शेकडो नागरिक गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात जमा झाले.

वसीम कुरेशी याचे शव एका पलंगावर टाकून संतप्त जमाव किनवट ठाण्याकडे निघाला. युवकांनी हातात दगडं घेत दहशत माजवत गोकुंदा व किनवट शहरातील दवाखाने, औषधी दुकाने या अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद करायला लावली. काही दुकाने व दुचाकींवर दगडफेक करुन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. किनवटच्या रामनगर, ममता चौकातील युवकांनी एकत्र येऊन दहशत माजविणाऱ्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. माजी नगराध्यक्ष साजीद खान यांच्या मध्यस्थीने तणावाची स्थिती काहीअंशी निवळली.

पोलीस ठाणे व रस्त्यावर जमावाचा गोंधळ सुरु झाल्याचे कळताच सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे हे किनवटमध्ये दाखल झाले. त्यानंतर इतर ठिकाणाहून कुमक आल्यानंतर तणावाची स्थिती निवळली. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी किनवटला भेट दिली. दरम्यान,आदिलाबाद येथे उपचार घेणाऱ्या विशाखा मुनेश्वर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वसीम कुरेशी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उत्तम भरणे याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!