ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• खतगावकर, पोकर्णांसह चक्क डी. पी. सावंत यांनीही सोडली खा. अशोकरावांची साथ
मुंबई/ नांदेड – नांदेड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून एका मोठ्या गटाने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आदींचा समावेश आहे. “गोदातीर समाचार” ने सुमारे १० दिवसांपूर्वीच भाजपाला नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसणार असून भाजपाचा मोठा गट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दिले होते. ते वृत्त आज खरे ठरले.
माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाल्याचे अनेकांना ज्ञात होते. पण अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही खा. अशोकराव चव्हाण यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज दि. २० सप्टेंबर रोजी मुंबई येथे काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे मेव्हणे असून खतगावकर यांनी त्यांच्या स्नुषा माजी जिल्हा परिषद सदस्य मीनल पाटील खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खतगावकर यांच्यासह डी. पी. सावंत यांनी सोडलेली साथ खा. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माजी खासदार खतगावकर यांचा नायगाव, देगलूर, बिलोली मतदारसंघांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी मला न्याय दिला नाही, अशी भावना त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्याआधीच खतगावकर हे भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. त्यांनी मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी केली होती. दि. 20 सप्टेंबर रोजी मुंबई येथे नाना पटोले यांच्यासोबत त्यांची अगोदर भेट व चर्चा झाली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी भास्करराव पाटील खतगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जि. प. च्या माजी सदस्या तथा जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, राजेश पावडे आदी पदाधिकाऱ्यांची पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थिती होती.
डी पी सावंत काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये !
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काळात माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी जाहीरपणे कोणतीही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे ते अशोकराव चव्हाण यांच्यासह भाजपात गेले की काँग्रेसमध्येच कायम आहेत याबाबत तर्कवतर्क लावण्यात येत होते. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र डी. पी. सावंत यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे जाहीर करत काँग्रेसच्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागही घेतला. तरीही डी. पी. सावंत यांच्या नेमक्या भूमिकेबाबत सातत्याने चर्चांना उधान येत होते. आज मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यातच त्यांच्या आता काँग्रेसमध्येच असण्यावरही शिक्कामोर्तब झाले असून डी. पी. सावंत हे काँग्रेस मधून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
दोन जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांची अनुपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्याला नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, हणमंत पाटील बेटमोगरेकर आणि महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी मात्र अनुपस्थिती होती. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रमुख नेते पक्ष कार्यालयातील बैठकीला उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻