Saturday, December 21, 2024

भोकर- उमरी रस्त्यावरील अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार; टायर फुटून वाहन पुलावरून खाली कोसळले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• सर्व मयत भोकर तालुक्यातील रहिवाशी; इतर ५ जण जखमी

भोकर (जि. नांदेड)- भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहनाचे समोरचे टायर फुटल्याने चालकाचा गतीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. हे वाहन हाळदा-मोघाळी गावाच्या दरम्यान असलेल्या हळदा तलावाच्या पुलावरुन खाली पडल्याने हा भीषण अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले आहे.

भोकर शहरात नातेवाईकांच्या घरील कार्यक्रम आटोपून काल दिनांक ८ रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान तेलंगणाकडे चार चाकी वाहनाने जात असतांना वाहनाचे समोरचे चाक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भोकर-उमरी रस्त्यावरील हाळदा-मोघाळी दरम्यान असलेल्या हाळदा तलावाच्या पुलावरुन वाहन खाली कोसळले. वाहनातील काही जणांनी आरडाओरड केल्याने जवळच्या शेतात असलेले शेतकरी मदतीसाठी धावून आले. त्यांनी या भीषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पो.नि.सुभाषचंद्र मारकड, महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड, सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव, सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे, जमादार रवि मुधोळे, पो.ना. परमेश्वर कळणे, पो.कॉ.लहु राठोड, पो.चालक मंगेश क्षिरसागर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल, सुलेमान शेख, शाहरुख खान आदी तात्काळ घटनास्थळी पोहचले.

वाहनात अडकलेल्या बाहेर काढले असता यातील सविता श्याम भालेराव (२५), प्रिती परमेश्वर भालेराव (८) दोघी रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड (९) रा. रामखडक ता.उमरी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तर गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव(३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(२८), श्याम तुकाराम भालेराव (३५) तिघे ही रा.रेणापूर ता.भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले असता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

जखमींवर भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार केले. गंभीर जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. तसेच इतर जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (९), प्रितेश परमेश्वर भालेराव (८),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (७), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव(२८) सर्वजण रा. रेणापूर ता.भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदरील घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

रेणापूर गावावर शोककळा
मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत. सदरील अपघातात एकाच गावातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणीनंतर दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी मयत ५ जणांच्या पार्थिवावर रेणापूर ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!