Sunday, December 22, 2024

मला मजबुती देण्यासाठी खा. चिखलीकरांना विजयी करा -पंतप्रधान नरेंद्र मोदी; शंकरराव चव्हाण यांची आठवण सांगत अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचे केले स्वागत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• चेहराच नसणाऱ्या इंडी आघाडीकडे इतका मोठा देश देणार का? – मोदींचा सवाल

• चार जूनच्या निकालानंतर इंडी आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील – नरेंद्र मोदी

नांदेड– मला मजबुती देण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना भरघोस मतदान करा असे आवाहन नांदेड येथील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण सांगत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला.

शहराच्या जुना कौठा भागात मोदी मैदानावर भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख व डॉ. संतुक हंबर्डे, संजय कौडगे, माजी आमदार अमर राजुरकर, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, देविदास राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धर्माधिकारी, रिपब्लिकन पक्षाचे विजय सोनवणे यांच्यासह नांदेड लोकसभेचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे शिवसेना उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण सकाळी सव्वा अकरा वाजता सुरू करताच छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, हर हर महादेव अशा घोषणा देत सुरू केले. नांदेडकर आणि हिंगोलीकरांना माझा साष्टांग नमस्कार असेही ते म्हणाले. 26 एप्रिलची तयारी झाली ना असा प्रश्न विचारला. मराठवाड्याच्या पवित्र भूमीमध्ये श्री गुरु गोविंदसिंग, रेणुका माता, दत्त भगवान यांना प्रणाम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नानाजी देशमुख या दोन्ही भारतरत्नांना त्यांनी अभिवादन केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, काल झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे एनडीए पक्षाला एकतर्फी मतदान झाले. त्यामुळे एनडीए सरकारचा विश्वास वाढला. मतदान सर्वांनी करावे. देशाचे भविष्य पक्के आणि मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे. देशाची सुरक्षा करण्यासाठी जसे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल टाकून उभे राहतात तसेच मतदारांनीही देश वाचविण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा. मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विजय आज नाही, उद्या, उद्या नाही परवा परवा नाही तेरवा होईल परंतु मतदान वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मात्र विरोधक त्यांचा पराजय पक्का असल्याचे लक्षात येत असल्याने ते मतदान करण्यासाठी मतदारांना प्रेरित करत नसल्याचे दिसून येते. भारतामध्ये मतदान टक्केवारी जर वाढली तर त्याचा प्रभाव जागतिक पातळीवर होतो. त्यासाठी लोकशाहीची ताकद दाखविण्यासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

शंकरराव चव्हाण यांची आठवण आणि अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचे स्वागत

राजकीय क्षेत्रात अत्यंत यशस्वी कारकीर्द उपभोगत असतानाही आणि मोठमोठी पदे भूषविलेली असतानाही शंकरराव चव्हाण यांच्यातील नम्रता आणि जिव्हाळा कायम स्मरणात असून प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही सातत्याने देशाला विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात आता अशोक चव्हाण हेही सोबत आले आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “मी राजकारणात नव्हतो, तेव्हापासून चव्हाण कुटुंबीय राजकारणात आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचा योग सत्यसाईबाबा यांच्या पूठ्ठपुर्ती येथे आला होता. तेव्हा मी राजकारणात नव्हतो. त्यावेळी शंकरराव चव्हाण यांचा नम्रतेचा आणि जिव्हाळ्याचा स्वभाव मला आजही प्रेरित करतो, असे मोदी म्हणाले. राज्य आणि केंद्रात इतकी महत्त्वाची पदे भूषविल्यानंतरही त्यांच्यात इतकी नम्रता पाहून मी आजही त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो”, अशी आठवण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपत येण्याने आनंद झाल्याचे सांगितले.

देशात लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी झाले. या मतदानामध्ये एनडीए महायुतीला एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. चार जूनच्या निकालानंतर आपापले पक्ष वाचविण्यासाठी इंडिया आघाडी करून एनडीएच्या समोर उभ्या असणाऱ्यांमध्ये मतभेदआहेत. ते निकालानंतर एकमेकांचे कपडे फाडून घेतील. काँग्रेसला आपल्या महत्त्वाच्या जागेवर उमेदवार मिळाला नाही अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, देश अशा लोकांच्या हातात देणार का? असा प्रश्न उपस्थित करून नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेचे बाबुराव कदम कोहळीकर यांना विजयी करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथे केले.

इंडिया आघाडी आपापले पक्ष वाचविण्यासाठी एकत्र आली; परंतु पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये मतदारांनी त्यांना नकार दिला. कारण इंडिया आघाडीकडे देश चालविण्यासाठी चेहरा नाही. देश कोणाच्या स्वाधीन करणार असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसने आपला पराजय पक्का होत असल्याचे लक्षात घेतले असून त्यांना सोनिया गांधी यांचे नाव न घेता लोकसभेत निवडून येण्याची हमी नसल्याने त्या मागच्या दरवाजाने राज्यसभेमध्ये संसदेत आल्या. त्यांना उमेदवार भेटत नाहीत. ज्या ठिकाणी भेटला तिथे प्रचार करण्यासाठी कोणी जात नाही. 25% जागांमध्ये त्यांचा आजही अंतर्गत वाद आहे. एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. यांच्यावर जनता भरोसा ठेवेल का? असे लोक पार्लमेंटमध्ये (संसदेमध्ये) गोंधळ घालण्यासाठी येतात. राहुल गांधी यांना अमेठी पारंपारिक मतदार संघ सोडून वायनाडमध्ये जावे लागले. तिथेही त्यांना विजयाची खात्री नाही त्यामुळे ते येणाऱ्या काळात अजून आपल्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ शोधतील आणि भविष्यात वायनाडसुद्धा सोडून देतील असा आरोपही मोदी यांनी केला आहे.

काँग्रेसचा एक परिवाराला अशा परिस्थितीमध्ये मतदान आपल्याला मिळत की नाही यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे त्याच ठिकाणी त्यांचा उमेदवार नसल्याने त्यांना मतदान बीजेपीला करावे लागणार आहे ही शोकांतिका आहे. चार जूननंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील समजदार मतदार इंडिया आघाडीला मतदान करणार नाही हे पहिल्या टप्प्यातील मतदानातून दिसून आले आहे. मोदी सरकार देशातील गरीब, दलित, मजूर, स्त्री, शेतकरी यांच्या हितासाठी काम करत आहे. परंतु त्यांच्या विकासात काँग्रेस एक भिंत म्हणून आडवी येत आहे. मोदी सरकारच्या योजनेला नाव ठेवत आहे. देशातील करोडो महिलांना शौचालय दिले, पक्के घर दिले, बँक खाते उघडले, डिजिटल इंडिया केला. परंतु या सर्व विषयावर काँग्रेस वेगळा अर्थ काढून नागरिकांची व देशातील मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

मराठवाडा आणि महाराष्ट्र विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. या भागात उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठवाडा सिंचन, उद्योग, दळणवळणामध्ये सक्षम झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. आता तर नांदेडचे अशोकराव चव्हाण आमच्या सोबत आले. राज्याचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे योग्य रीतीने करत आहेत‌ त्यांना आता साथ अशोक चव्हाण यांची मिळाली आहे. अशोक चव्हाणच्या वडिलांची शंकराव चव्हाण यांची आंध्रप्रदेशमधील संत साईबाबा यांनी माझी ओळख करून दिली. राजनीती जीवन काय असते ते शंकरराव चव्हाण यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांची नम्रता त्यांचा अनुभव हे नक्कीच मला दिशा देणारा ठरला. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. पीक विमा योजना आहे. किसान सन्मान योजना आहे. बेरोजगारांसाठी वेगवेगळे उद्योग सुरू केले. आयुष्यमान भारत योजना सुरू केली. लोकांना पक्के घरं दिले, उड्डाण योजना, रेल्वे, रस्ते यासह आदी विकासाच्या कामांमध्ये मोदी सरकार कटिबद्ध आहे आणि मोदीची गॅरंटी ती कधीही चुकीची नाही. दहा वर्ष जो आम्हाला विकास करता आला परंतु येणाऱ्या काळात यापेक्षाही गतीने देशाचा विकास करू आणि देश एका जागतिक पातळीवर नेऊन पोहोचण्याचा काम करायचे आहे. काँग्रेसने जे खड्डे पाडले ते खड्डे बुजविण्यास आमचा जास्त वेळ गेला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नांदेडची पवित्र भूमी श्री गुरुगोविंद सिंग या भूमीसोबतच करतारपूर कॅरिडॉर, लंगर टॅक्स फ्री करण्याच्या हालचाली आहेत. अफगाणिस्तानवर ज्यावेळेस संकट आले त्यावेळेस तेथील गुरु ग्रंथ साहेब हे पवित्र ग्रंथ सरकारने भारतात आणला. अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांना सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. आमचे सरकार जे बोलते ते करून दाखवते. कलम 370, तीन तलाक, राम मंदिर या सोबतच आता भारताची अर्थव्यवस्था 12 वरून पाचवर आणण्यात आली आहे ती येणाऱ्या काळात तीनवर नेण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी ४०० पार खासदार दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे. राम मंदिर बांधले त्यावेळेस काँग्रेसने विरोध केला, पूजाअर्चा पाखंड आहे असे सांगितले गेले. या लोकांना माफ करू नका असे ही ते म्हणाले. भारत सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा या लढवय्या भूमीनेही प्रयत्न केले आहे. बुथवर मतदान शंभर टक्के झाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि बाबुराव पाटील कोहळीकर या दोघांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, देशाचा पंतप्रधान हा स्वच्छ मनाचा आणि हिम्मतबाज आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आमच्या सरकारने दहा टक्के दिले आणि ते न्यायालयात टिकले. येणाऱ्या काळात पूर्ण आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. शीख समाजाचाही विश्वास आमच्या सरकारवर वाढलेला आहे. मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. चांद्रयानसारखे यशस्वी प्रयोग करून मोदींनी देश जागतिक पातळीवर नेला आहे. त्यांनी आपले जीवन पूर्ण देशासाठी समर्पित केल आहे.

सन 2014 पूर्वी देशांमध्ये दंगे, भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले होत होते. परंतु मोदी जेंव्हापासन आले तेव्हापासून देश सुरक्षित आहे असे शिंदे म्हणाले. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी एक मत म्हणजेच मोदींना मत. देशाचे पंतप्रधान मोदींना करणे किती गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. देशाला विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर न्यायचे असेल तर तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करावे लागणार आहे आणि मोदीच देशाला महासत्ता बनवू शकतात यात मात्र ती शंका नाही. महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील याबद्दल मला शंका नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राम मंदिरच नाही तर मोदींनी देशात राम राज्य आणल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. देशामध्ये फक्त आणि फक्त मोदी गॅरंटी चालत आहे. करोडो लोकांना रोजगार, महिलांना सुविधा, अन्न- वस्त्र- निवारा या मूलभूत गरजा पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारने पुरविले आहेत. परंतु विरोधक काँग्रेस राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांना कुठल्याही बाबतीत मतदान करू नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

खा. अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नसून, राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यालाही कुठलीच अडचण नाही, केवळ अफवा पसरविणे, गैरसमज निर्माण करून समाजात असंतोष पसरविण्याचे काम विरोधकांकडून होत आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी यावेळी मराठा आरक्षणावरून मुद्द्यावरून विरोधकांवर केली.

खा.चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील ही पहिलीच सभा आहे. मतदानाला शेवटचे काही दिवस शिल्लक असून विकसीत भारताचा नारा हा देशाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी आहे. त्यामुळे नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह हिंगोली आणि लातूर या मतदाररसंघातूनही भाजप-मित्रपक्षांचे उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. जिल्ह्यात एकुण पाच खासदारांची वज्रमूठ तयार होणार असून त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टिकोन सर्वांच्या प्रयत्नातून साकार करायचा असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. तर सूत्रसंचालन प्रवीण साले यांनी केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!