Saturday, December 21, 2024

‘यळकोट यळकोट जय मल्‍हार’ च्या गजरात बेल- भंडारा उधळत माळेगाव यात्रेला सुरुवात; दक्षिण भारतातील प्रसिद्ध यात्रा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– ‘उत्तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी’ अशा जयघोषात, यळकोट यळकोट जय मल्‍हार असा गजर करीत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने आज गुरुवार दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी दक्षिण भारतातील प्रसिद्ध यात्रा माळेगावच्‍या श्री खंडोबारायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानकऱ्यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा करण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, आशाताई श्यामसुंदर शिंदे, प्रणितीताई देवरे- चिखलीकर व मान्यवरांनी खंडोबाचे दर्शन घेवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली.

यावेळी भाविकांनी शिस्तीत रांगेत राहून खंडोबाचे दर्शन घेतले. दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु झालेल्या यात्रेमुळे जागोजागी चैतन्य पाहावयास मिळाले. बेल-फुल, भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषाने मंदिर परिसर निनादून गेला. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. खंडोबाच्या देवस्वारीची पुजा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी करुन दर्शन घेतले. परंपरेनुसार रिसनगावचे पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक यांच्यासह इतर मानकऱ्यांचा फेटा बांधून जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.

मानकऱ्यांचा गौरव
पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्‍यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला.

यात्रेचे आजवरचे वैभव लक्षात घेवून जिल्हा परिषदेने यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात पाणी, उर्जा, आरोग्य यावर विशेष लक्ष दिले आहे. लम्पी आजारामूळे गो वंशीय पशुधनावर बंदी घातली असून त्याबाबत काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तथापि इतर पशुधनासाठी याठिकाणी 24 तास वैद्यकीय सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर भाविकांच्या आरोग्याबाबतही काळजी घेण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या सेवाही तत्पर ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप माळोदे यांनी दिली.

लम्पी समवेत नव्याने कोरोनाचे आव्हान येवू घातले आहे. सद्यपरिस्थितीत  चिंतेचे कारण जरी नसले तरी मागच्या अनुभवावरुन काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नाही. यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे सिध्द झाले आहे. हे लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण व्हावे यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असून माळेगाव येथे कोरोना लसीकरणाचे कक्ष सुरु करण्यात येत आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.  नागरिकांनी स्वयंस्फूर्त पुढे येवून लसीकरणावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

खंडोबा यात्रेत वाघ्‍या- मुरळी
‘उत्तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजूरी, उत्तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी’ असा घोष करत वाघ्‍या- मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्‍दतीने कवड्याच्‍या माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हाता- पायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या-मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

जिल्हा परिषदेच्यावतीने याठिकाणी लोककल्याणकारी योजनांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कृषि विभाग, पशुसंवर्धन, समाज कल्याण व इतर विभागांचा समावेश आहे.  या यात्रेत आश्व, श्वान, कुक्कुट व इतर प्राण्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चोख पोलीस बंदोबस्त
श्रीक्षेत्र खंडोबाच्या माळेगाव यात्रेदरम्यान यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक पंचक्रोशीतून जमा होतात. यात्रेला महिला, युवा वर्गासह आबालवृद्धांचाही समावेश असतो. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार यांच्यासह आदी अधिकारी नजर ठेवून आहेत. यात्रेत बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!