Thursday, December 26, 2024

लातूरच्या श्रीनगर भागात थरार; खुनाच्या घटनेतील फरार आरोपीचा पोलिसांवर हल्ला, पोलिसांनी केला गोळीबार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर– पोलीस कोठडीतून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच आरोपीने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनीही त्या आरोपीवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. हा थरार शहरातील श्रीनगर भागात घडला.

चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापोली शिवारात जागेच्या वादातून सचिन दावणगावे या २६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यास चाकूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र चाकूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुख्य आरोपी नारायण इरबतनवाड हा पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात शोध घेतला. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक शहरातही शोध घेतला. मात्र आरोपी सापडला नाही.

अखेर हा मुख्य आरोपी लातूर शहरातील श्रीनगर भागातील एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची गुप्त माहिती चाकूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत) तथा तपास अधिकारी बालाजी मोहिते यांना काल मध्यरात्री समजली. त्यांनी पोलीस यंत्रणेला तसेच सहकाऱ्यांना कल्पना देऊन आरोपीचे घर गाठले. भाड्याच्या घरापुढे पोलीस आल्याचे समजताच आरोपी नारायण इरबतनवाड हा पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी एकटे अधिकारी असलेले बालाजी मोहिते आणि आरोपीची झटापट झाली. यात आरोपीने पोलीस अधिकारी मोहिते यांच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारले. तसेच एका हाताने त्यांचा गळा आवळला. तसेच मोहिते यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्वर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी प्रसंगावधान राखून बालाजी मोहिते यांनी स्वसंरक्षणार्थ स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून मुख्य आरोपी नारायण इरबतनवाड याच्या कमरेखाली गोळी झाडली. यात आरोपी हा गंभीर जखमी झाला.

या थरार सुरू असतानाच काही वेळात इतरही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले. अखेर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या घटनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली. आरोपी नारायण इरबतनवाड याच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलीस अधिकारी बालाजी मोहिते हेही जखमी असून त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपी नारायण इरबतनवाड याच्या विरोधात पोलीस ठाणे अहमदपूर येथे कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याशिवाय राज्यातील बीड, अहमदनगर, खामगाव, बुलढाणा येथे एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर आरोपी अंमली पदार्थांचा व्यापार करीत आहे का याबाबत चौकशी करीत असल्याचेही निखिल पिंगळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!