ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर– रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तिथे युद्धाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे सुरू झालेल्या या युद्धामुळे अनेक परदेशी नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. अडकलेल्या या भारतीयांमध्ये लातूर जिल्ह्यातील एका मुलीचाही समावेश आहे. औसा तालुक्यातील ऋतूजा सोमनाथ देशमाने ही विद्यार्थिनी तिथे अडकली असून ती युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. युद्धस्थिती चिघळत चालल्याने देशमाने कुटुंबिय चिंतातूर झाले आहेत.
युक्रेनमधील चर्नीव्हतसी (chernivtsi) शहरातील बुकोव्हिनियन (Bukovinian) वैद्यकीय विद्यापीठात ऋतूजा देशमाने ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या किव (kyiv) शहरापासून चर्नीव्हतसी (chernivtsi) हे शहर जवळपास ५३० किमी अंतरावर आहे. युक्रेन आणि रशिया या देशात युद्धाची स्थिती बिघडत असताना लातूर जिल्ह्याच्या औसा येथील ऋतूजाच्या कुटुंबियांना तिची चिंता सतावू लागली आहे. आपल्या मुलीला सुखरूपपणे मायदेशी परत आणा अशी आर्त हाक औसा येथील सोमनाथ देशमाने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
युद्धजन्य स्थितीमुळे युक्रेनमध्ये एटीएम बंद पडत असून पैशाची तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना पैशांची चणचण भासत आहे. त्यातच विमानाचे तिकीट मिळत नसल्याने सर्वच जण चिंतातुर आहेत. रशियाने अनेक ठिकाणचे विमानतळ उध्वस्त करण्यास सुरुवात केल्याने देशमाने कुटुंबीय अधिकच चिंतातुर झाले आहेत. वडील सोमनाथ यांच्यासह आई विद्यावती आणि बहीण वृषाली हे सतत टीव्ही पुढे बसून युद्धजन्य स्थितीचा आढावा बातम्यातून घेत आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी लवकरात लवकर ऋतूजासह इतरही भारतीय विद्यार्थांना तात्काळ भारतात आणण्याची सोय करण्याची अशी त्यांची मागणी आहे. ऋतूजासह लातूर जिल्ह्यातील आणखी काही विद्यार्थी अडकल्याचेही सोमनाथ देशमाने हे सांगत आहेत. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची चिंता संपूर्ण देशाला लागून राहिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻