Sunday, January 5, 2025

शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड; नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकरही नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा मोबाईल रात्रीपासून स्विच ऑफ

नांदेड– शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडालेली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकरही नॉट रिचेबल झाले आहे, त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांचा मोबाईल काल रात्रीपासून स्विच ऑफ आहे.

विधान परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देत आपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणला. शिवसेनेचीही मतं फोडत भाजपचे पाच उमेदवार विजय झाल्याने शिवसेनेला हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा असणारे शिवसेना नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेच्या काही आमदारांना सोबत घेत गुजरात गाठले आहे. ते शिवसेना सोडणार की काय असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात हा राजकीय भूकंप झाला आहे.

यातच नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचाही मोबाइल फोन कालपासून स्विच ऑफ येत आहे. त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. आ. कल्याणकरही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले की काय अशी चर्चा यानिमित्ताने नांदेडमध्ये सुरू झाली आहे.

नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर हे विजय झाल्यानंतर सुरुवातीपासूनच ते एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधुन असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे आ. कल्याणकर यांचे स्वीय सहाय्यक यांचेही फोन बंद आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार कल्याणकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भव्य असा कार्यक्रम घेतला होता. असे असताना आमदार कल्याणकर यांच्या भूमिकेमुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असून चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेच्या अनेक आमदारांसह 4 मंत्रीही नॉट रिचेबल 

एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे राज्यातील अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले. या आमदारांसह काही मंत्रीही नॉट रिचेबल आहेत. यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. मंत्रीसुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

काल संध्याकाळी विधानपरिषदेसाठीचे मतदान पार पडताच एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन सुरतला जाण्याचं प्लानिंग केल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर मुंबईतून सूरतसाठी फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यानंतर सुरतमध्ये एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करून आधी काही आमदारांना सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आलं. त्यानंतर दीड वाजता एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी काही आमदार त्या हॉटेलमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येते. 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूरतमध्ये भाजपचे नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांसोबत होते, असे सांगितले जाते. सूरत पोलिसांनाही रात्री याप्रकाराची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सकाळी एकनाथ शिंदे आणि आमदार थांबलेल्या हॉटेलचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहे. विधान परिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील घडामोडी बद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांचा नाशिकमध्ये कार्यक्रम नियोजित होता. पण, तो कार्यक्रम रद्द करून फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!
WhatsApp Group