ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स् कॉलेजच्या पदवी आणि पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘भारतीय लोकशाहीच्या संवर्धनात माध्यमांची भूमिका: अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावरील आयोजित दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आज ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा. सौ. श्यामल पत्की होत्या.
या दोन दिवसीय कार्यक्रमातील पहिल्या सत्रात ‘भारतीय लोकशाहीच्या संवर्धनात माध्यमांची भूमिका : अपेक्षा आणि वास्तव’ यावर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी आपली मतं मांडली. आपल्या उदघाटनपर भाषणात बर्दापुरकर यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमजगतात कोणते आणि कसे बदल झाले याचा आढावा घेतला. मुद्रित माध्यमांच्या जोडीला टी.व्ही. आणि इंटरनेटसारखी माध्यमे आली. शिक्षणाच्या विस्ताराने वाचक वर्ग विस्तारला मात्र त्याबरोबर दर्जेदार पत्रकारितेचा संकोच झाला याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सर्वांसमोर वाढती धर्मांधता आणि आर्थिक विषमता ही दोन आव्हाने आहे असे ते पुढे म्हणाले. या सदंर्भात माध्यमांनी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत तरच देशात लोकशाहीचे संवर्धन होईल असे त्यांनी या वेळी नमूद केले.
आपल्या अध्यक्षीय समोरापात प्रा. सौ. श्यामल पत्की यांनी, स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वतंत्र्योत्तर कालखंडात आणिबाणी दरम्यान वर्तनानपत्रांनी बजावलेल्या भूमिकेची उपस्थितांना आठवण करुन दिली. तसेच त्यांनी वर्तमानपत्रात वापरल्या जाणाऱ्या भाषेतील अचुकतेचा अभाव यावर चिंता व्यक्त केली.
‘स्थानिक वृत्तपत्रे आणि तळागळातील लोकशाही’
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात मान्यवर वक्त्यांनी ‘स्थानिक वृत्तपत्रे आणि तळागळातील लोकशाही’ आपली मते व्यक्त केली. या सत्रात उत्तम दगडू (संपादक, दै. गाववाला), शंतनु डोईफोडे (संपादक, प्रजावाणी), केशव घोणसे-पाटील (संपादक, दै. गोदातीर समाचार) आणि ॲड. प्रदीप नागापुरकर सहभागी झाले होते.
नरहर कुरुंदकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, उप प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एन. सिद्धेवाड यांची उपस्थिती होती.
आपल्या मांडणीत उत्तम दगडू यांनी, दबलेल्या माणसांचा आवाज म्हणून माध्यमांनी काम केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले. तसेच त्यांच्याकडे केवळ पैसे कमावण्याचे साधन म्हणून बघू नये असे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले. शंतनू डोईफोडे यांनी, स्थानिक वर्तमानपत्रांनी सर्वसामान्य मतदाराला आपल्या मताच्या मुल्याची जाणीव करु दिली आणि त्यायोगे लोकशाही बळकट केली आहे असे सांगितले. भारतातील लोकशाही आज अखंडितपणे चालू आहे, याचे श्रेय माध्यमांचे आहे. मात्र कागद, शाई इ-इ च्या वाढत्या किंमतीमुळे स्थानीक वर्तमानपत्रांच्या समोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत असे त्यांनी नमूद केले. आज लोक इतरांसोबत माध्यमांना देखील प्रश्न विचारत आहेत. तसेच आजघडीला केवळ माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आलेली नसून सर्वच क्षेत्रांची- अगदी शिक्षण क्षेत्राची देखील विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे असे त्यांनी प्रतिपादित केले.
आपल्या मांडणीत केशव घोणसे पाटील यांनी, लोकशाहीच्या बळकटीसाठी माध्यमांनी दिलेल्या योगदानाला दुर्लक्षित करून माध्यमांना केवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या वाढत्या वृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. लोकांच्या माध्यमांकडून अपेक्षा वाढल्या असून सर्व प्रकारच्या माध्यमांनी भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत योगदान दिले आहे असे सांगितले. या प्रसंगी बोलताना ॲड. नागापुरकर यांनी माध्यमे ही नफ्यासाठी चालविता कामा नयेत, तर ती समाजसुधारणेसाठी असायली हवी असे मत मांडत परिस्थिती वाटते तितकी निराशाजनक नाही असे सांगितले.
यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. व्ही. टी. दहीफळे, डॉ. व्ही. आर. पतंगे, डॉ. ए. व्ही. दातार, प्रा. पी. एस. पोले, डॉ. बालाजी चिरडे, डॉ. अमोल काळे, डॉ. विकास सुकाळे, प्रा. कल्पना जाधव, प्रा. ए. आर. इनामदार, डॉ. अजय गव्हाणे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻