ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा फळविक्रेते अब्दुल हबीब रहीम बागवान यांना 19 जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला पोलीस घेऊन गेले आहेत. परंतु ते धोलपूर रेल्वे स्थानकावरून पळून गेल्याची नोंद शिमला पोलिसांनी राजस्थानच्या भरतपूर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे अब्दुल हबीब बागवान हे नेमके कुठे आहेत याचे गूढ निर्माण झाले आहे. ते बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली असून याप्रकरणी स्वतः लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे केली आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्रुट मार्केटमध्ये अब्दुल हबीब रहीम बागवान यांचे दुकान आहे. या दुकानांमध्ये सफरचंद खरेदी केल्याप्रकरणी सव्वाकोटीचा धनादेश बँकेत वटला नसल्याची तक्रार शिमला पोलीस ठाण्यात तक्रारदार अनुप पाल यांनी केली होती. या तक्रारीवरून अब्दुल हबीब बागवान यांच्या वडीलाचे नाव गुन्ह्यात दाखल होते. मात्र हिमाचल पोलिसांनी 19 जुलै रोजी अब्दुल हबीब रहीम बागवान यांना नांदेड येथून घेऊन गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
त्यानंतर धोलपूर रेल्वे स्थानकावर अब्दुल हबीब बागवान पळून गेल्याची नोंद राजस्थानच्या भरतपूर पोलीस ठाण्यात शिमला पोलिसांनी केली आहे. त्यांना सोडवून आणण्यासाठी त्यांचे भाऊ शकील बागवान हे त्यांच्या पाठीमागे गेले असता, हिमाचल पोलिसांनी उडवाउडीचे उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नांदेडमधून चार चाकी गाडीतून नेल्यानंतर धोलपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे प्रवास कसा काय केला? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अब्दुल हबीब बागवान हे एका पायाने दिव्यांग आहेत. त्यांना नीट चालता येत नाही मग ते पोलिसांच्या ताब्यातून पळून कसे जातील, असा प्रश्नही नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
दिनांक 19 जुलैपासून हबीब बागवान बेपत्ता असल्याने नातेवाईकांमधून शंका- कुशंका निर्माण केल्या जात आहेत. याप्रकरणी नातेवाईकांनी आमदार मोहन हंबर्डे, माजी उपमहापौर मसूद खान, माजी नगरसेवक शेरा अली यांच्यासह आदींनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻