ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ टीसी साठी ४०० रूपयांची लाच मागितली
किनवट (जि. नांदेड)- विद्यार्थ्याची टीसी देण्यासाठी ४०० रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या येथील एसव्हीएम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नेम्मानीवार यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दि. १७ रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर मुख्याध्यापिकेच्या घराची झडतीही एसीबीच्या पथकाने घेतल्याचे सांगण्यात आले.
किनवट शहराच्या बसस्थानक परिसरात सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाने त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची (टीसी) मागणी शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नेम्मानीवार यांच्याकडे केली होती.
त्या मुलीची टीसी काढण्यासाठी ६०० रुपये द्यावे लागतील, असे मुख्याध्यापिकेने मुलीच्या पालकाला सांगितले. पैसे कशाबद्दल द्यायचे, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पालकाने ६०० रुपयाच्या पावतीची मागणी केली. पावती देण्यास नकार देत मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी ६०० ऐवजी ४०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर मुलीच्या पालकाने दि.१६ रोजी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका वीणा नेम्मानीवार यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी एसव्हीएम प्राथमिक शाळा परिसरात सापळा रचला. तक्रारदार पालकाकडून टीसीसाठी ४०० रूपयाची लाच सरकारी पंचांसमक्ष घेताना पथकाने मुख्याध्यापिका वीणा नेम्मानीवार यांना रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर पथकाने नेम्मानीवार यांच्या वेलमापुरास्थित घराची झडती घेतल्याचे सांगण्यात आले. एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक कालिदास ढवळे यांच्या अधिपत्यात गजेंद्र मांजरमकर, मेनका पवार, स. खदीर, मारुती सोनटक्के, प्रकाश मामुलवार यांनी पार पाडली. विशेष म्हणजे तक्रारदार पालक शिक्षक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻