ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ लाखों रुपये किंमतीच्या सोने- चांदीच्या मुर्त्या चोरट्यांनी केल्या परत
धर्माबाद/ नांदेड– चोरट्यांच्या अजब वागणुकीचा प्रकार नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या कंदकुर्ती गावात समोर आला आहे. या गावातील मंदिरातून आधी तर चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीच्या मूर्त्या चोरी केल्या. पण नंतर चोरी केलेल्या याच मूर्त्या पार्सलने परत पाठवून दिल्या आहेत. या अजब प्रकाराने सारक जण अचंबित आहेत.
महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवर तेलंगणा राज्यात चोरट्यांनी चोरलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मुर्त्या पार्सलने परत पाठविल्याचा अजब प्रकार घडला आहे. आरएसएसचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या कंदकुर्ती गावातील ही घटना आहे. या गावातील तीनशे वर्षांहून जुन्या असलेल्या श्रीराम मंदिरात चोरट्यांनी महिनाभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीत सोन्याचांदीचे दागिने आणि तीनशे वर्षे जुन्या, प्राचीन अशा दुर्मिळ मुर्त्या चोरूण्यात आल्या होत्या.
चोरीला महिना उलटून गेला तरी या चोरीचा तपास लागत नसल्याने स्थानिकांत संताप होता. काही संघटनांनी या चोरीचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तीनशे वर्षांपेक्षाही अधिक जुन्या देवदेवतांच्या मुर्त्या चोरीला गेल्याने आणि त्याचा छडा लागत नसल्याने भाविकांतील संताप वाढत होता. या चोरीचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे देण्याच्या हालचाली तेलंगणा सरकारने सुरू केल्या होत्या, त्यादृष्टीने सोमवारी निर्णय अपेक्षित होता.
मात्र, तत्पुर्वीच चोरट्यांनी अत्यंत आश्चर्यकारकपणे चोरी केलेले सोन्या चांदीचे सर्व दागिने आणि लाखों रुपये किंमतीच्या प्राचीन मुर्त्या एका बॉक्समध्ये पार्सल करत ऑटोद्वारे मंदिराला परत पाठवल्या आहेत. या प्रकाराने सर्वच भाविक आनंदित झाले असले तरी आश्चर्यचकितही झाले आहेत. या चोरीचा तपास वरिष्ठांकडे गेल्यास आपण अटक होऊ भीतीपोटी चोरट्यांनी मुद्देमाल परत पाठवला असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अनेक जण अनेक शक्यता बांधुन तर्क वितर्क लावत आहेत.
आरएसएसच्या भावना होत्या तीव्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांचे कंदकुर्ती हे मूळ गाव आहे. गावात मुक्कामी असताना हेडगेवार गुरुजी सातत्याने याच मंदिरात दर्शनासाठी जात असत. त्यामुळे या परिसरातच त्यांचा पुतळा देखील आहे. याच मंदिरातील दुर्मिळ आणि प्राचीन मूर्त्यांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातून चोरट्यांना देखील आपल्या कृत्याची उपरती झाल्याने आणि त्यांनी चोरलेले सर्व दागदागिने आणि मुर्त्या परत पाठवल्याने याची मोठी चर्चा सर्वत्र होत आहे. चोरट्यांनी मुद्देमाल परत केला असला तरी त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻