ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- गावाकडे जाण्यासाठी ऑटो स्टॉपवर थांबलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला अनोळखी दोन चोरट्यांनी लिफ्ट दिली खरी! मात्र काही अंतरावर जाऊन दुचाकी थांबवून चाकूचा धाक दाखवून त्या शिक्षकाला लुटले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, दोन अंगठ्या आणि दोन मोबाईल असा एक लाख रुपयाचा ऐवज जबरीने चोरून नेला. ही घटना बुधवार दि. 27 जुलैच्या सायंकाळी सहाच्या सुमारास मुदखेडपासून जवळच असलेल्या आयटीआय ते मेंढका रस्त्यावर घडली.
जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मेंढका येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक रामा माणिक बोधनवाड (वय 59) हे कामानिमित्त मुदखेडला गेले होते. दिवसभर काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी परत ऑटोने गावाकडे जाण्यासाठी भोकर ऑटो पॉईंट येथे थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ एका दुचाकीवरून अनोळखी दोन जण आले आणि आम्ही तुमच्या गावाकडे जात आहोत चला, यायचे का अशी विचारणा त्यांनी केली. अशीही सायंकाळची वेळ आणि वाहन मिळत नसल्याने रामा बोदमवाढ हे त्यांच्यासोबत त्यांच्या दुचाकीवर जाण्यास तयार झाले आणि त्यांच्या गादीवर बसले.
मुदखेडपासून आयटीआयच्या पुढे काही अंतरावर जाताच या चोरट्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सेवानिवृत्त शिक्षक रामा बोदमवाड यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची चैन, दहा ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, रेडमी आणि सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण 97 हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून घेतला. चोरट्यांच्या हातात चाकू असल्याने शिक्षकांना प्रतिकार करणे शक्य नव्हते. त्यांनी फारसा प्रतिकार न करता आपल्या जवळचे सर्व दागिने चोरट्यांना काढून दिले. त्यानंतर चोरटे मुदखेड मार्गाने परत पळाले.
या प्रकरणाची माहिती रामा बोदमवाड यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात जाऊन दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मुदखेड शहरातील रस्त्यावरील काही सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाची फिर्याद रामा बोदनवाड यांनी दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻