ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ अर्धापूर- नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक होणार की बिनविरोध होईल या निवडीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाली असुन दि.१४ फेब्रुवारी रोजी या दोन्हीही पदांची निवड केली जाणार आहे. मात्र येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कोणाची निवड होणार याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून त्याची छाननी त्याच दिवशी दुपारी २.०० नंतर होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेणे दि.१० फेब्रुवारी दुपारी ४.०० वाजेपर्यंत आणि दि.१४ फेब्रुवारी सकाळी ११.०० दुपारी ४.०० वाजेपर्यंत विशेष सभेत नगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत उमेदवारी दाखल केली जाणार असून दुपारी ३.०० ते ३.३० वाजता छाननी आणि ३.३० ते ३.४५ वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर त्याच दिवशी दुपारी ३.४५ नंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी लेखी पत्रकाद्वारे दिली आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीत काॅग्रेस पक्षाने एकूण १७ जागेपैकी १० जागेवर विजय मिळाला होता.तर एकमेव अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे संख्याबळ ११ वर गेले असून एमआयएम – ३, भाजपा – २, राष्ट्रवादी – १ असे पक्षीय बलाबल आहे.नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी सुटले असल्याने नगराध्यक्ष पद कोणाला मिळेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक नगरसेवकांना नगराध्यक्ष पद मिळावे यासाठी बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे विविध मार्गाने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे भविष्यातील आवाहने लक्षात घेता नगराध्यक्षपदी सक्षम काम करणारा व विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन अर्धापूर शहराचा विकास करणाऱ्याला नगराध्यक्ष करतील अशी शक्यता आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻