ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड)- अर्धापूर तालुक्यात शेतीत आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. तालुक्यातील सांगवी शिवारात शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचा आखाडा जळून खाक झाला आहे. आज दि.३० बुधवारी रोजी दुपारी लागलेल्या या आगीत गाय,वासरू गंभीररित्या भाजून जखमी झाले आहेत. आखाड्यावरील ठिबक व शेतीचे साहित्य, अन्नधान्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगवी शिवारात कामाजी शिवाजी जाधव (शेत गट क्रमांक २४) यांच्या शेतातील आखाडाच्या बाजूला असलेल्या डीपीवर शॉर्टसर्किट झाल्यामुळे आखाड्याला आग लागून उभ्या असलेल्या गव्हाच्या पीकास आगीने वेढले. यामुळे पूर्ण गहू जळून खाक झाला. या आगीत आखाड्यावरील ठिबक, पाईप, शेतीची अवजारे हे साहित्य जळाले असून एक गाय व वासरू भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
अचानकपणे झालेल्या या शॉर्टसर्किटमुळे आग विझविण्यासाठी शेतक-यांनी बराच आरडाओरडा केला, पण काही उपयोग झाला नाही. आग इतकी मोठी होती की १० ते १५ मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. या आगीचा महसूल विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची शासनाच्यावतीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी कामाजी शिवाजी जाधव यांनी केली आहे.
अर्धापूर तालुक्यात शेतीत आग लागण्याच्या घटना सातत्याने होत असून महावितरणकडून कमी- अधिक अशा अनियंत्रित पद्धतीने वीज पुरवठा होत असल्यानेच आगीचे हे प्रकार होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यात लागलेल्या आगीच्या अनेक घटनांमध्ये शेतकऱ्यांची गहू, ऊस अशी अनेक पिकं तसेच शेती औजारे, साहित्य, जनावरे जळून खाक झाली असून यात त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻