ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी काल सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मधू चव्हाण यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. अशोकराव चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे भाजप खासदार यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत आवर्जून बोलावून घेतल्याचे समजते. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाण म्हणाले की, आजपासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करत आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही जोरदार जल्लोष केला. राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. हायकमांडने प्रदेश काँग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अशोक चव्हाणांसोबत आणखी किती नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधून आणखी काही मोठी नावं पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशा चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठीसुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालताना दिसत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻