ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहराच्या सिडको परिसरातील प्रदीप वाईन शॉप मध्ये कार्यरत असलेल्या व्यवस्थापकाचा एका टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करुन निर्घृण खून केला. आवडत्या ब्रँडची बिअर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा जीव गेला. ही घटना एक सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिडको परिसरातील ढवळे कॉर्नर येथे माजी नगरसेवक संदीप सुभाषराव चिखलीकर यांचे प्रदीप वाईन शॉप आहे. या दुकानात माधव जीवनराव वाकोरे ( वय ३२ ) रा. काटकळंबा ता. कंधार हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. एक सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास व्यवस्थापक माधव वाकोरे यांच्या दुकानात साई इंगळे नावाचा युवक आला. त्याने टूबर्ग कंपनीची बियर मागितली. परंतु ही बिअर दुकानात उपलब्ध नसल्याने माझा ब्रँड का दाखवित नाहीस, दुकानात का ठेवत नाहीस असा दम देऊन साई इंगळे काय चीज आहे, थांब तुला दाखवतो असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर पुन्हा साडेनऊच्या सुमारास त्याच्या चार ते पाच साथीदारांना घेऊन तो पुन्हा दुकानात आला. हातात घातक शस्त्र घेऊन ते दुकानात आले. वाकोरेस दुकानातून बाहेर बोलावून ते शिवीगाळ करत होते. यावेळी साईनाथ गुडमलवार यालाही त्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर काही कळण्याच्या आतच या टोळक्याने व्यवस्थापक माधव वाकोरे यांच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून केला.
दरम्यान, माधव वाकोरे व या तरुणांमध्ये झटापट झाली. या दरम्यान, साई इंगळे आणि पम्या उर्फ प्रेमसिंग सपुरे व त्यांच्या इतर साथीदारांनी धारदार शस्त्राने माधव वाकोरे यांच्या पोटावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत वाकोरे यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच माधव वाकोरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीअंती घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत फासले, उपनिरीक्षक अनिल बिच्चेवार, महेश कोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. रात्रीच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि दुकान मालक संदीप चिखलीकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.
आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणी साईनाथ जळगाव याच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात साई इंगळे, पम्या उर्फ प्रेमसिंग सपुरे व त्यांच्या इतर चार साथीदाराविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. स्वतः सपोनि पांडुरंग माने व शिवसांब घेवारे यांचे पोलीस पथकाने या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा पाठपुरावा केला. सदर आरोपी हे सांगवी बु भागात एका ठिकाणी लपुन बसल्याची गोपनिय माहिती त्यांना मिळाली. त्यावरुन सदर पोलीस पथकाने त्या भागात शोध घेतला असता, आरोपी हे आसना नदीच्या चौकात थांबल्याची माहिती मिळाली. त्या आरोपींची माहिती काढत सदर पथक हे आसना नदीचे चौकात पोहचले असता, आरोपींनी पोलिसांना पाहुन अर्धापुरकडे जाणाऱ्या रोडने पळ काढला, तेंव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन तीन इसमांना पकडले. त्यांचे नाव साईनाथ सुभाषराव इंगळे वय 28 वर्षे व्यवसाय अँटो चालक रा. दत्तनगर, नांदेड, त्याचा भाऊ उमेश सुभाषराव इंगळे वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. दत्तनगर, नांदेड, व बालाजी मारोतराव कुरुडे वय 37 वर्ष व्यवसाय अॅटो चालक रा. दत्तनगर, नांदेड असे आहे. त्यांना गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी व त्यांचे इतर फरार इतर साथीदारांनी मिळुन बिअर मागण्याच्या कारणावरुन गुन्हा केल्याचे सांगितले. त्या तिन्ही आरोपींना आज दुपारी तीन वाजता ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, सपोनि शिवासांब घेवारे, पोउपनि अशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहु, सपोउपनि सलीम बेग, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पद्मा कांबळे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, विठल शेळके, रुपेश दासरवाड, महेश बडगु, राजु सिटीकर, शेख कलीम, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻