ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ ३६ एकरमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात ७ सभामंडप
◆ २०० पुस्तकांच्या गाळ्यांची नोंदणी, १००० निमंत्रित साहित्यिक
◆ अजय-अतुल यांची संगीत रजनी, ‘चला हवा येऊ द्या’ आदी विविध कार्यक्रमही होणार
लातूर- उदगीर येथे घेण्यात येत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन २२ एप्रिल रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप २४ एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात येत्या २२ ते २४ एप्रिल दरम्यान हे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, कार्यवाह रामचंद्र तिरुके, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, प्रकट मुलाखत, सत्कार, सीमावर्ती कवींचे संमेलन, परिचर्चा, बालकुमार मेळावा आदी भरगच्च साहित्याची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सुमारे २०० पुस्तकांच्या गाळ्यांची नोंदणी संमेलनानिमित्त झाली आहे. साहित्य संमेलनानिमित्त येणाऱ्या साहित्यिकांची निवासव्यवस्था उदगीर, लातूर, बिदर येथे करण्यात आली आहे. विविध स्टॉल यानिमित्ताने उभारण्यात आले आहेत. चित्र, शिल्प, व्यंग चित्रकला यासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे.
२२ एप्रिल रोजी साहित्य संमेलनास सुरुवात होत असली, तरी २० एप्रिल रोजी सायंकाळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांची संगीत रजनी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील विनोदी कार्यक्रम, २३ एप्रिल रोजी स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम व महाराष्ट्राचा लोकोत्सव तर २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक तथा संगीतकार अवधुत गुप्ते यांची संगीतरजनी, असा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी असे या परिसरास नाव देण्यात आलेले आहे. तब्ब्ल १००० निमंत्रित साहित्यिक या साहित्य संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत. ३६ एकरमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनात ७ सभामंडप तयार करण्यात आले आहेत.
२२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. सकाळी १.३० ते दुपारी १.३० हा मुख्य उद्घाटन सोहळा होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, उद्घाटक खासदार शरद पवार, मावळते अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची उपस्थिती राहणार आहे.
२४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत समारोपास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व खासदार सुधाकर शृंगारे हे उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻