ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• परिवहन निरीक्षक विजयसिंह राठोडसह पाच जणांविरुद्ध भाग्यनगरमध्ये गुन्हा दाखल
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- येथील परिवहन प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यात तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार दिवसाढवळ्या चक्क शहराच्या मोर चौक भागात घडला. सहाय्यक परिवहन निरीक्षकास परिवहन निरीक्षकाने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्यास जबर मारहाण केली. हे प्रकरण “दैनिक गोदातीर समाचार” ने चव्हाट्यावर आणल्यानंतर अखेर 24 तासांनी या प्रकरणात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबईहून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या दोन्ही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
सहा महिन्यापूर्वी नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुजू झालेले सुदर्शन वसंतराव देवढे (वय 27, राहणार यश नगरी युनिट दोन काबरानगर नांदेड) यांना त्यांचे वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह राठोड हे मागील काही दिवसापासून सतत त्रास देत होते. 25 मे रोजी देवढे यांना फोनवरून त्यांनी धमकी दिली. मी लोकलचा आहे, माझा दोन तालुक्यात संपर्क आहे. माझी या भागात चलती आहे. त्यामुळे तू मी सांगेल ते गाड्या सोडायच्या, तसे जर केले नाहीस तर तुला मी पाहून घेईन अशी धमकी त्यांनी दिल्याची पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच माझे या भागात खूप मित्र ओळखीचे आहेत आणि या भागात ते वाहने चालवितात. त्यांच्या गाड्यांचे कुठलेही कागदपत्र तपासायचे नाही. असा दमही त्यांनी फोनवरती दिला. गाड्यांकडून मिळणाऱ्या देवाण घेवाणीवरून त्यांनी हे सर्व केल्याचे सांगण्यात येते.
त्यानंतर काही वेळाने पुन्हा धमकीचा फोन केला आणि त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी व्हाट्सअप कॉल करून तुला भेटायचे आहे. माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, तू मला विश करणार नाहीस का असे त्यांनी सांगितले. वरिष्ठाचा फोन असल्याने मी नक्कीच तुम्हाला विश (शुभेच्छा) करायला येईन असे देवढे यांनी सांगितले. फिर्यादीत पुढे देवढे यांनी म्हटले आहे की, त्यानंतर रात्री आठ वाजता विजय राठोड यांनी मला मोर चौकात बोलावून घेतले. मोर चौकात ते दिसले नसल्याने मी छत्रपती चौकाकडे गेलो. परत त्यांचा फोन आला मी मोर चौकात कार पार्किंगमध्ये लाईट लावून थांबलो आहे, लवकर ये असे म्हणून त्यांनी मला बोलावून घेतले. मोर चौकात आल्यानंतर विजयसिंह राठोड व त्याच्या इतर चार अनोळखी साथीदारांनी मला बेदम मारहाण केली. खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर विजयसिंह राठोड यांनी, याचा माज उतरायचा आहे म्हणून एका साथीदाराला गाडीतून चाकू आणण्यासाठी सांगितले आणि चाकू आणला व माझ्या गळ्यावर ठेवला. यावेळी मी झटका देऊन यातून सावरलो. मात्र या पाच जणांपैकी एकाने माझ्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन चोरली असल्याचे देवढे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
मारहाण करताना राठोड यांनी, त्या सतीशलाही सांग त्याच्याही कुटुंबासहित कार्यक्रम करीन आणि तुला तर आत्ताच संपवतो. तुझी फॅमिली गायब करतो अशी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जवळपास 70 हजार रुपयांची दोन तोळ्याची चैन यांनी चोरून घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी घडलेला प्रकार मी माझा मित्र सतीश संभाजी भोसले यांना फोनद्वारे सांगितला आणि हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगून अखेर भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून मोटार परिवहन निरीक्षक विजयसिंह राठोड आणि त्याच्या इतर चार साथीदाराविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 223/ 24 कलम 143, 147, 148, 149, 379, 294, 323, 504, 506 (2) भादविसह कलम 4/ 25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चिटमपल्ले करत आहेत. विजयसिंह राठोड सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकंदर आधीच बदनाम असलेले आरटीओ कार्यालयातील खाबुगिरी या प्रकाराने चव्हाट्यावर आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻