ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा
लातूर :- औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून ‘शेत तिथे रस्ता’ या अभियानाचा अनोखा औसा पॅटर्न निर्माण केला आहे. जवळपास ९३३ किमी लांबीच्या शेत रस्ते यामुळे खुले झाले आहेत. या शेत रस्ता अभियानाचा तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाचा लोकार्पण व उदघाटन सोहळा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दि. ४ जून रोजी औसा इथे पार पडणार आहे.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून औसा मतदार संघातील ९३३ किमी लांबीचे शेत रस्ते आणि पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले. गावागावात स्वतः जाऊन त्या ठिकाणचे अतिक्रमण काढून वाद मिटवून हे रस्ते गेल्या अनेक वर्षानंतर मोकळं श्वास घेऊ लागले आहेत. या मोकळ्या करण्यात आलेल्या शेत रस्त्यांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आमदार निधी खर्च करण्यास सुरुवातही आ. अभिमन्यू पवार यांनी केली.
९३३ किमी शेत रस्त्याच्या माती कामासाठी जवळपास ०८ कोटी ५० लाख रुपयांचा आमदार निधी पवार यांनी खर्च केला आहे. तर जवळपास ३०० किमीच्या शेत रस्त्याचे आतापर्यंत मजबुतीकरण करण्यात आलं असून यासाठी तब्बल २९ कोटी रुपयांचा निधी मनरेगाच्या माध्यमातून खर्च करण्यात आला. त्यामुळे शेत रस्त्याच्या या ‘औसा पॅटर्न’ ची राज्यभर चर्चा झाली. शेत रस्ते-पाणंद रस्त्यानी मोकळा श्वास तर घेतलाच आहे. मात्र याचे मजबुतीकरणाचे काम ही लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय. याशिवाय मनरेगाच्या माध्यमातून आतापर्यंत १२०० हेक्टर फळबाग लागवड पूर्ण झाली असून ०१ हजार ९० जनावरांच्या गोठ्यानाही मनरेगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या ‘शेत तिथे रस्ता’ अभियानाचे तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाचा लोकार्पण आणि उदघाटन सोहळा शनिवार, ०४ जून रोजी सकाळी ०९ वा. पार पडणार आहे. औसा येथील उटगे मैदानावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय रसायने-खते राज्यमंत्री भगवंत खुब्बा, भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्पा कराड यांच्यासह लातूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आ.अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻