ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
किनवट- तालुक्यातील चंद्रपूर या घनदाट जंगलातील शिवारात कपाशीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलीस व महसूलच्या पथकाने जवळपास पावणेतीन लाखांचा ५२ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणातील ३ आरोपी फरार आहेत.
तालुक्यातील रामपूर शिवारात ४ वर्षांपूर्वी पोलिसांनी एक- दोन नव्हे, तर १९ शिवारातून २३ क्विंटल गांजा जप्त केला होता. या मोठ्या कारवाईनंतर दुर्गम पहाडी व घनदाट जंगलातील चंद्रपूर शिवारातील गंगासिंग साबळे यांच्या मालकीच्या शेतात किसनसिंग साबळे, बजरंग साबळे यांनी कपाशीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार या शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांचे पथक शनिवारी किनवटमध्ये दाखल झाले. स्थानिक पोलीस तसेच महसूलचे मंडळाधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन पथक चंद्रपूर शिवारात दाखल झाले. मुख्य रस्त्यापासून ४- ५ किलोमिटरवर असलेल्या घनदाट जंगलातील कपाशीच्या शिवारात गांजाची झाडे लागवड केल्याचे पथकाला दिसून आले. कारवाईची कुणकुण लागताच तिघे आरोपी पसार झाले.
पोलिसांनी लागवड केलेली सर्व गांजाची झाडे तोडून मोजदाद केली. एकूण ५२ किलो २८o ग्रॅम वजनाच्या २ लाख ६१ हजार ४०० रुपयांचा गांजा पथकाने जप्त केला. गेल्या ८ दिवसांपूर्वीच स्थानिक बीट जमादाराने याच शिवारातून काही गांजाची झाडे जप्त केल्याची चर्चा होती. कांही प्रत्यक्षदर्शीनीं याबाबत माध्यमांना माहितीही दिली. यासंदर्भात संबंधित बीट जमादाराकडे चौकशी केली असता, त्यांनी असा काही प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले होते. दीडशे किलोमिटर लांब असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला गांजा लागवडीची माहिती मिळते,परंतु स्थानिक बीट जमादार असा काही प्रकारच नसल्याचे सांगतात. या प्रकाराचीही जोरदार चर्चा या कारवाईनंतर होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻