ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ वडील स्व. वसंतराव काळे होते तीन वेळा आमदार
औरंगाबाद– मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला आहे.
विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना १३ हजार ४८९ मते मिळाली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी १३ हजार ५४३ मते मिळविली. त्यांनी भाजप उमेदवार किरण पाटील यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची ५४ मते अधिक घेतली. विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन हजार ४८५ मते बाद झाली.
महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या किरण पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच आघाडी मिळविली. मतमोजणी अखेर महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे चौथ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांनी भाजप-युतीचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला. काळे यांना एकूण २५ हजार ३८० तर किरण पाटील यांना १६ हजार ६८३ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सुर्यकांत विश्वाराव हे होते. त्यांना १४ हजार १२८ इतकी मते मिळाली. इतर कोणत्याही उमेदवाराचा प्रभाव निवडणुकीत जाणवला नाही.
एकूण १४ उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या सुर्यकांत विश्वासराव यांना अनपेक्षितपणे लक्षवेधी मते मिळवली आणि दुहेरी वाटणारी लढत तिरंगी झाली. भाजपने पुर्ण शक्तीपणाला लावून देखील किरण पाटील मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून बंडखोरी केलेले प्रदीप सोळुंके, भाजपचे नितीन कुलकर्णी हे पुर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत.
विक्रम काळे यांनी या मतदारसंघातून विक्रमी असा हा सलग चौथा विजय मिळविला आहे. यापूर्वी विक्रम काळे यांचे वडील वसंतराव काळे यांनीही एक वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला होता. वसंतराव काळे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा तर शिक्षक मतदारसंघातून एक वेळा विजयी होऊन विधानपरिषदेत पोहोचले होते. विक्रम काळे यांनी एकप्रकारे आपल्या वडिलांचाच विक्रम मोडून काढला आहे.
एकंदर वसंतराव काळे यांनी मिळविलेले तीन विजय आणि विक्रम काळे यांनी मिळविलेले चार विजय, अशी काळे कुटुंबियांकडे तब्बल सातव्यांदा आमदारकी आली आहे. मराठवाड्यातील मतदारांकडून त्यांच्यावर दाखविला जाणारा हा विश्वास अभूतपूर्व आणि ‘विक्रमी’ असाच म्हणावा लागेल. स्व. वसंतराव काळे हे मराठवाड्यातील प्रत्येक गावात कार्यकर्ता असणारे नेते म्हणून ओळखले जायचे. वडिलांची तीच ओळख विक्रम काळे यांच्याही बाबतीत लागू होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻