Thursday, November 21, 2024

खासदार हेमंत पाटील यांच्या घर, कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त; शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेनंतर बंदोबस्त, आज दुपारनंतर पत्रकार परिषद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची चर्चा

नांदेड– हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा त्यांचे नाव शिंदे गटाशी जोडण्यात येत असून यामुळे नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर नांदेड।येथील त्यांच्या तरोडा नाका येथील ‘तुळजाई’ निवासस्थानी आणि याच भागातील ‘गोदावरी अर्बन’च्या मुख्य शाखेला नांदेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार हेमंत पाटील शिंदे गटात जाणार का? अशा चर्चा सुरू झाली असून नवी दिल्लीत दुपारनंतर ते आणि इतर खासदारांची पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात मागील पंधरा दिवसांपासून राजकीय घडामोडी लक्षात घेता शिवसेनेतून बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सोबत घेऊन भाजपची सलगी गेली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक शिवसेनेचे नेते आणि आता अनेक खासदारही शिंदे गटात सामील होत आहेत. कालच शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांना शिंदे गटाकडून नेते पदावर निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र सुरू आहेत, याचा अद्याप कोणीही खंडन केलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हेमंत पाटील यांच्यासह बारा खासदार ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर आज त्यांच्या “सहकारसूर्य” या गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला आणि त्यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. या बंदोबस्तावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आहेत.

खासदारांची पत्रकार परिषद ?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे 12 खासदार आज दुपारनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेतील १२ खासदारांनाही आपल्याकडे खेचून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याची तयारी चालवली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १८ पैकी बाराहून अधिक खासदार आपल्याकडे असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असून शिवसेनेतील राष्ट्रीय पातळीवरील फूट पडली असून आज हे सर्व खासदार उघडपणे समोर येणार असल्याचे समजते.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनुमती दिल्यास खासदार राहुल शेवाळे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते असतील आणि तसे पत्र शिंदे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना आज, मंगळवारी दिले जाणार असल्याचे समजते. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आपल्यासोबतच्या खासदारांचा गट एनडीएसोबत असल्याची माहिती या बैठकीत दिली जाणार असल्याचे समजते.

नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदिल दिल्यास मंगळवारीच लोकसभेत यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचाही अंदाज आहे. त्यांच्याकडून तूर्त थांबण्याचा सल्ला दिल्यास त्याप्रमाणे खासदारांबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे कळते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!