ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचा दोन वेळा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री यांना कळविला आहे.
प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतात मोठे स्फोट घडवून आणू अशी धमकीही या कॉलमध्ये देण्यात आल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. एवढेच नाही तर हेमंत पाटील यांच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 14 डिसेंबर रोजी हे कॉल आले असून खलिस्तान दहशतवादी गुर्दीपसिंग पन्नू या नावाने हे कॉल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना 14 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनवरून आम्ही भारताला आमची ताकद दाखवून दिली आहे. 10 जानेवारी आणि 26 जानेवारी या दोन दिवशी भारतामध्ये स्फोट घडवून आणू. स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा अशी धमकी हेमंत पाटील यांना देण्यात आली. एकदा नव्हे तर दोन वेळेस खा. हेमंत पाटील यांना फोन कॉल आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कॉल आल्याची ही बाब खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, लोकसभा अध्यक्ष, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही आपल्या यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेडस्थीत ‘तुकाई’ या निवाससस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हा फोन नेमका कोणी आणि कुठून आला याची चौकशी पोलीस करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻