ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अंतरवाली सराटी- जालना : भाजप नेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये रात्री १ वाजेपर्यंत चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. तर सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून भेटायला आल्याने अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं.
यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या गाड्यांचा ताफा 10 ते 12 किलोमीटर दूर ठेवला होता, असे सांगण्यात आले. रात्री उशिरा सुमारे बाराच्या सुमारास मनोज जारंगे पाटील गेवराई तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साध्या गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 900 एकरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आव्हान दिलेलं आहे, हे विशेष! मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अचानक भेटीमुळे बोलले जात आहे.
अशोक चव्हाण समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असं मी आधी विचारले. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करु म्हणले होते ती आजपर्यंत का केली नाही. गुन्हे परत घेण्याऐवजी जास्त गुन्हे वाढत आहेत. हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते ते का घेतले नाही? ते समाज म्हणून करत असतील तर आम्ही अशोक चव्हाण यांना दोष देणार नाहीत. आमची फसवणूक झाली आहे हे आम्ही त्यांना ठणकावून सांगितले आहे. जाणून बुजून गृहमंत्री यांनी खोटे केसेस दाखल करायला लावत आहेत. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केली जात नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
24 मार्चला बैठकीचं आयोजन
आम्ही 24 तारखेला महाराष्ट्राची बैठक आयोजित केली आहे. पुढची दिशा काय असावी ते ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक, सभांचे आयोजन केलेले आयोजक आणि मराठा समाज यांची बैठक घेणार आहोत. 24 मार्चला सकाळी 10 वाजता अंतरवालीमध्ये ही बैठक होणार आहे. आता निर्णायक बैठक होणार आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. जातीशी गद्दारी करणारी आपली औलाद नाही, आणि आता तुम्हाला सुट्टी नाही. 24 मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
या भेटीवर खा. अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही. जरांगे पाटील यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्त आहे त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे, आणि ही माझी भूमिका आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻