ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये खिचडीच्या कारणावरून एकाचा पिता- पुत्रांनी निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी पिता-पुत्रांना अटक करून आज गुरुवारी दि. ३१ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेड तालुक्यातील धनेगावजवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणारा योगेश विलास गिरी (वय २६) हा व शिवलिंग व्यंकटराव गायंकी (वय ४५) हे दोघेजण देगाव, येळेगाव कारखाना ता. अर्धापूर येथे कामासाठी गेले होते. दोघेजण भोकरफाटा मार्गे घरी आले. येताना योगेश गिरी याने भोकरफाटा येथून खिचडी पार्सल घेतली, पण खिचडीचे हे पार्सल ते शिवलिंग गायंकी याच्या घरी विसरले. त्या दरम्यान शिवलिंगच्या घरच्याने ही खिचडी खाल्ली. थोड्या वेळाने खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला. पण, ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, यात योगेश गिरीचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना रात्री अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक हंबर्डे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻