ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ बहिणीला भेटण्यासाठी आला असताना घडली घटना
नांदेड– वसमत तालुक्यातील चिखली येथील दोघेजण आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याने अनोळखी मारेकर्यांनी त्यांच्यावर चाकूने भोसकले. यात अनिल शेजुळे याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असणारा राजकुमार शेजुळे हा जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निरीक्षक अनंत नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर होते. चिखली तालुका वसमत येथील अनिल शेजुळे आणि राजकुमार शेजुळे हे दोघेजण आपल्या बहिणीला भेटण्यासाठी नांदेडला दुचाकीवरून आले होते. त्यांची दुचाकी मगनपुरा भागात आल्यानंतर एका दुचाकीस्वाराला त्यांचा धक्का लागला. यातूनच त्यांचा वाद झाला आणि अनोळखी मारेकर्यांनी या दोघांवर चाकूने हल्ला चढविला. यात अनिल शेजुळे हा गंभीर जखमी झाला तर राजकुमार शेजुळे हा किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवि वाहुळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस वाहनातून या दोघांनाही नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच अति रक्तस्राव झाल्याने अनिल शेजुळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻