ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– महानगरपालिके अंतर्गत गुंठेवारी प्रकरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. हे प्रकरण थेट सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) गेल्याने अनेकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. काहींनी या प्रकरणात खुलासा केला आहे. ही तपासणी सुरू असतानाच माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांना स्पीड पोस्टद्वारे ईडीची नोटीस आली आहे. या पत्रामध्ये गुंठेवारी संबंधात दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे पत्र मिळताच शमीम अब्दुल्ला यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर हे पत्र बनावट आहे किंवा खरे, याची पडताळणी इतवारा पोलिसांकडून सुरू झाली आहे.
नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या गुंठेवारी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकार उघड झाले. यात एक कर्मचारी निलंबित करून काही कंत्राटी अभियंत्याविरुद्ध व मालमत्ताधारकाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा वजिराबाद पोलिसांकडून तपास सुरू असतानाच अचानक मुंबई येथील सक्त वसुली संचालनालयाचे अधिकारी नांदेडमध्ये धडकले आणि हा प्रकार ईडीकडे गेला. या प्रकरणातील जवळपास साडेसहा हजार प्रस्ताव (फायली) तपासण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यातील काही फायली बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी या विभागाचे प्रमुख, अभियंते व काही कर्मचारी यांचेही जबाब नोंदविले.
एकूणच हे प्रकरण गंभीर वळण घेत असतानाच अचानक महापालिकेचे माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांना (Fno-Ecir/841/muzo-1/2023/AD/RV ) एक पत्र आले आहे. त्या पत्रावर ईडी विभागाचे जॉईन्ट सेक्रेटरी निखीलकुमार गोविला यांची स्वाक्षरी असून त्यांनी त्यांच्या अधिकारांत दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शमीम अब्दुल्ला यांना मुंबई येथील ईडी झोन कार्यालय येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हे पत्र बनावट असल्याचे शमीम अब्दुल्ला यांचे म्हणणे आहे.
या पत्रासंदर्भात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनीही या प्रकरणात आम्ही शमीम अब्दुल्ला यांच्या तक्रारीवरून ईडी कार्यालयाला रितसर पत्रव्यवहार करून आलेल्या पत्राची पडताळणी करणार असल्याचे सांगितले. मात्र महापालिकेतील अनेकांना या पत्राने घाम फोडला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻