ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नायगाव (जि. नांदेड)- गुप्तधनाच्या लालसेपोटी चक्क मंदिरातील महादेवाची पिंड बाजूला सारून खोदकाम करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नायगाव तालुक्यात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्र फिरवत तिघांना अटक केली आहे.
बिलोली पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या गोपनिय माहितीच्या आधारे कुंटूर पोलिसांनी मंदिर चोरीतील तीन आरोपीतांना चोवीस तासांच्या आत अटक करण्यात यश मिळविले आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुष्णूर एम. आय. डी. सी. मधील फ्लेमींगो मेडिसिन कंपनीच्या बाजुस शंकर महाजन यांचे शेतातील हेमाडपंथी महादेव मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी महादेव मंदिरात जाऊन मंदिरामधील महादेवाची दगडाची पिंड उखरून बाजुस काढत त्या खाली अंदाजे दीड फुटाचा खड्डा खोदला. गुप्तधन शोधण्याच्या मोहात हा खड्डा खोदुन महादेव मंदीरातील पिंडीचे नुकसान करून विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ दिगांबर कमठेवाड (वय 61) व्यवसाय शेती रा. कुष्णूर ता. नायगाव यांचे फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात कलम 379, 295, 511 भादविप्रमाणे दिनांक आठ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोउपनि संजय अटकोरे यांच्याकडे दिला होता.
मंदिरातील पिंड फोडीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना ही बाब त्यांनी कळविली. अर्चित चांडक यांच्या गोपनिय माहितीच्या आधारे दोन पथके स्थापन करून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. महादेव पुरी यांच्यासह पोउपनि दिनेश येवले, सपोउपनि रमेश निकाते, पोहेकॉ संतोष कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे, मोहन कंधारे, पोशि अशोक घुमे, चालक रामेश्वर पाटील, होमगार्ड यश यांनी या गोपनिय माहितीच्या आधारे चोवीस तासांचे आत तीन आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
यात बालाजी बाबु इरपे, (वय 32) व्यवसाय शेती रा. बरबडा ता. नायगाव, विष्णु आनंदराव डुकरे (वय 32) व्यवसाय मोटार मेकॅनिक रा. कोरका पिंपळगाव ता. जि. नांदेड, अशोक विट्ठल मैसनवाड (वय 45) व्यवसाय शेती रा. बरबडा यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻