ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – शहराच्या भावसार चौक परिसरातील अष्टविनायकनगरमध्ये मंगळवार दि. ७ मे रोजी दुपारी चार वाजता सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडले आहे. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही त्यांना गोळीने प्रत्युत्तर दिले, यात एक आरोपी जखमी झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री साडेनऊ वाजता असदवन शिवारातून लुटारूंना अटक केली. पोलिसांना चकमा देऊन पळ काढणाऱ्या आरोपींचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या पथकावर आरोपींनी गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार यांनीही आरोपीच्या उजव्या पायावर गोळी मारुन आरोपीला जखमी केले. जखमी आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे पकडलेले दोन्ही आरोपी हे पंजाब राज्यातील असून एका गंभीर आजाराने ते त्रस्त असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बुधवार दि. ८ मे रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावसार चौकाजवळ असलेल्या अष्टविनायकनगर मध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचारी रवींद्र जोशी (वय ६८) यांचा पाठलाग करून अनोळखी दोन चोरट्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून जखमी केले. आणि त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये रक्कम आणि एक मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. या घटनेत रवींद्र जोशी यांनीही चोरट्यासोबत दोन हात करत झटापट केली. मात्र चोरट्यांनी गोळीबार केल्याने हतबल झालेले रवींद्र जोशी यांच्या हातातील चाळीस हजारांची रक्कम घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले. हा धक्कादायक प्रकार त्यांच्या शेजारी असलेल्या एका मुलाने व्हिडिओत कैद केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून चोरट्यांचा माग पोलिसांना काढता आला.
मालेगाव रोडवर भावसार चौक येथील एसबीआय बँकेतून रवींद्र जोशी हे काल मंगळवारी चाळीस हजार रुपये बँकेतून घेऊन घराकडे पायी आले. यावेळी बँकेत मुख्य आरोपी हरदीपसिंग बलदेवसिंग ढील्लोन (वय 34) या हॉटेल व्यापाऱ्याने आपले दोन साथीदार रोहित सतपाल कौडा (वय 25 वर्षे, राहणार बरीवाला, तालुका जिल्हा मुक्तसरसाहेब पंजाब) आणि सरप्रीतसिंग उर्फ साजन दलबिरसिंग सहोता (वय 24 वर्षे, राहणार अमृतसर, पंजाब) यांना घेऊन रेकी केली होती. हे तिघेही चोरटे बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. बँकेतील फुटेज आणि घटनास्थळाचा व्हिडिओ यातील साम्य साधत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तपासाच्या सूचना दिल्या.
घटनास्थळाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी भेट दिल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आरोपींना शोधण्यात विशेष परिश्रम घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हार्दिपसिंग हा काकांडी शिवारात हवेली नावाचा धाबा चालवतो अशी ओळख पोलिसांना पटली आणि त्याला पोलिसांनी काही तासाच्या आतच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मी सांगितलेल्या रोहित कौडा आणि सरप्रीतसिंग साजन यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले. ते दोघे सध्या असदवन शिवारात असल्याचे त्याने सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार व त्यांचे पथक या दोन्ही चोरट्यांच्या ठिकाणावर पोहोचले. रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस आपला पाठलाग करत असल्याची माहिती या चोरट्यांना लागताच त्यांनी चार चाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दिशेने सरप्रीतसिंग साजन यांनी गोळीबार केला, मात्र त्याचा निशाणा चुकल्याने अनर्थ टळला. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण यांनी शासकीय पिस्तूलमधून साजन याच्यावर गोळी झाडली. ती गोळी त्याच्या उजव्या पायाला लागून तो जखमी झाला. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, खंजर, रोख रक्कम 40 हजार रुपये, दुचाकी क्रमांक (एमएच 26- सीए 6200) आणि वॅगनर मारुती सुझुकी (एमएच 26 सीई- 8062) असा चार लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकाला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी आनंद बिचेवार यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 353, 34 भादविसह कलम 3/25, 27 (2) शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच या तिन्ही आरोपीवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात रवींद्र रामराव जोशी यांच्या फिर्यादीवरून कलम 394, 397, 34, ३/२५, 5/25, 27 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे रोहित कोडा आणि सरप्रीतसिंह साजन हे दोघेही एका गंभीर आजाराने त्रस्त असून दर्शनाच्या निमित्ताने ते नांदेडला आल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻