ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मुंबईत १ लाख २० हजारांचा आयफोन मोबाइल विकत घेतला
नवीन नांदेड- घरातून 5 लाख रुपये घेऊन नांदेडहून पळालेला अल्पवयीन मुलगा मुंबईत सापडला आहे. मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने नांदेड ग्रामीण पोलिसांनी मुलाचा शोध घेतला आहे.
आपल्याच घरातून 5 लाख रुपये घेऊन पळून गेलेला अल्पवयीन मुलाला शोधण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना शोधले. अल्पवयीन मुलगा हा 15 वर्षांचा असून घरातून निघताना त्याने घरातील 5 लाख सोबत घेऊन तो पळून गेला होता. या अल्पवयीन मुलासोबत त्याचा आणखी एक मित्रही त्याच्यासोबत होता. दोन्ही मुलांचे अपहरण झाले असल्याचे समजून आईवडिलांनी नांदेडमध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.९६/२२ कलम ३६३ नुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार व पोलीस नाईक बालाजी लाडेकर हे अधिक तपास करीत होते. अखेर पोलिसांना या मुलांचा मालाड परिसरातून शोध लागला. पोलिसांनी रकमेसह त्यांना ताब्यात घेतले आहे. नॉर्थ सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंदनशिवे व उपनिरीक्षक शेवाळे यांच्या सहाय्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी याबाबत कसून तपास सुरू करीत मुंबई सायबर पोलिसांकडेही मदत मागितली होती. मुंबई पोलिसांनी तपास केल्यानंतर ही मुलं मुंबईत आल्याचे त्यांना कळले. त्यानंतर तात्काळ हालचाली करीत सायबर पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासाची चक्रे फिरली आणि ही दोन्ही मुलं मालाड दिंडोशी परिसरात असल्याची माहिती समोर आली. दोन्ही मुलांनी काही वेळ कुर्ला येथे घालवला. त्यानंतर पुन्हा ते मालाड येथे गेले. ही सर्व माहिती नांदेड पोलिसांना देण्यात आल्यानंतर नांदेड पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले. ही मुलं बोरिवली परिसरातील एका हॉटेल (लॉज) मध्ये मुक्कामी होती.
घरच्यांनी त्याचा कपडे घेण्याचा आग्रह मान्य न केल्याने रागाच्या भरात १५ वर्षाचा हा मुलगा घरातून पळून गेल्याचे सांगण्यात येते. इतकंच नव्हे तर जाताना तो घरातील तब्बल 5 लाख रुपये सोबत घेऊन गेला. पळून जाताना त्याचा एक मित्रही त्याच्यासोबत होता. घरातून ५ लाख रुपये घेऊन मित्रासह तो आधी पूर्णा येथे गेला व तिथून ते पुण्याला गेले. पुण्याहून एका कॅबने ते मुंबईत गेल्याचे तपासात पुढे आले आहे. ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार घराच्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात केली होती. नांदेड शहराच्या कौठा परिसरातील गोरे आणि कांबळे कुटुंबातील ही मुलं आहेत. कौठा परिसरातीलच नागार्जुना शाळेचे ते विद्यार्थी आहेत.
मुंबईत १ लाख २० हजारांचा आयफोन मोबाइल विकत घेतला
मालाड येथे या मुलांनी १ लाख २० हजाराचा आयफोन मोबाइल त्यांनी घेतला. अन्य खरेदीसाठी फिरत असताना, पोलिसांना दोघांचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना सुखरूप नांदेड पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻