ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- अमेरिकन डॉलर दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करणे, वेळप्रसंगी भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करून रक्कम पळविणे या हेतूने नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणातील टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलर (भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये) आणि कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी गुरुद्वारा परिसरात आज सोमवार दि. २९ मार्च रोजी केली.
नांदेड शहरात दि. 29 मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार मारुती तेलंग, पोलीस अंमलदार तानाजी येळगे, मोतीराम पवार, गजानन बैनवाड आणि चालक शेख कलीम असे शासकीय जिपने नांदेड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग आणि गस्तकामी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते. यावेळी भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट नंबर एकच्या बाजूला बडपूरा येथे एर्टीगा (टीएस १७ जी- २०४५) गाडीत तेलंगणा राज्यातील पाच संशयित तरुण असल्याचे सांगितले. ते त्यांच्याकडे “एक बिलियन डॉलर्सची नोट (भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये) असल्याचे सांगून, ते ही नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करण्याचे आमिष दाखवित असल्याची माहिती मिळाली. फक्त पन्नास लाखात ही नोट घेऊन बाकीचे पैसे तुम्हीच घ्या” असे आमिष दाखवत असल्याची माहिती मिळाली. यावरून भारती यांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केले. मात्र, यात दोघेजण गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी महेश इल्लय्या वेल्लुटला (वय ३०) रा. सर्यापूर, तालुका गांधारी, जिल्हा कामारेड्डी, नंदकिशोर गालरेड्डी देवारम (वय 42) पोचंमागल्ली इब्राहिम पेठ बांसवाडा, तालुका बांसवाडा, जिल्हा कामारेड्डी आणि आनंदराव आयात्रा गुंजी (वय 32) राहणार नेकुनमबाबु जिल्हा प्रकासम, आंध्रप्रदेश (हल्ली मुक्काम गल्ली नंबर 1 बांसवाडा कामारेडी) यांना अटक केली. मात्र दशरथ आणि त्याचा मित्र हे दोघेही पसार झाले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता एक बिलियन डॉलरची नकली नोट असून ती लोकांना खरी म्हणून द्यायची व ते पैसे घेऊन आले की त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचे पैसे घेऊन पळून जायचे असा त्यांचा डाव होता.
पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, एक चाकू, एर्टीगा गाडी असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻