ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- चाकूचा धाक दाखवून लोकांना लुबाडणारी चक्क महिलांची टोळी नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. लोकांना रस्त्यात लुबाडणाऱ्या दोन महिलांना नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून दीड लाखाच्यावर किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अण्णाभाऊ साठे परिसरात असलेल्या एका रुग्णालयाजवळ कंधार तालुक्यातील माधव मोरे यांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते. ही घटना एक जून रोजी दत्तनगर परिसरातील अंकुर हॉस्पिटलजवळ घडली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंकुर हॉस्पिटलजवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी कंधार तालुक्यातील आलेगाव येथील माधव आप्पाराव मोरे हे आपल्या दुचाकीवरून आले होते. त्यांनी आपली दुचाकी रस्त्याला उभी करून रेल्वे पटरीच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ अनोळखी दोन महिला आणि एक पुरुष घेऊन चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्या खिशातील अगदी साडेतीन हजार रुपये, साडेबारा हजार रुपयाचा मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण 65 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जबरीने पळून नेला होता. विशेष म्हणजे चोरी केलेल्या दुचाकीवरूनच हे तिघे जण पसार झाले होते.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे, फौजदार मिलिंद सोनकांबळे, पोलीस हवालदार शेख इब्राहिम, रवी बामणे, दिलीप राठोड, देवीसिंग सिंगल, शेख अजहर यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत गुप्त माहितीवरून या चोरट्यांचा माग काढला.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील संशयित महिला गंगासागर उर्फ माया राजू माथेकर (वय 30), सीमा संतोष निळकंठे ( वय 27) या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेली पॅशन प्रो कंपनीची दुचाकी, एक मोबाईल, नगदी 3400 रुपये असा एकूण 65 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले सात अँड्रॉइड मोबाइल जवळपास 95 हजार रुपयांचे असा एकूण एक लाख 60 हजार 419 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील चोरटा मात्र फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलांना अटक केलेल्या या पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख आणि पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻