ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● हाणेगाव जिल्हा परिषद शाळेतील घटना
नांदेड– शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाकडून चांगल्या दर्जाचे धान्य शाळांना पुरविले जातात. परंतु हाणेगाव तालुका देगलूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवलेले तांदूळ, मूग डाळ, हरभरा असा 35 हजाराचा धान्य साठा अज्ञात चोरट्यांनी चोरला. ही घटना 10 ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली.
मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळा दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मुख्याध्यापक शिवानंद नागभूषण शिवाचार्य यांच्यासह सर्व शिक्षक व अन्य कर्मचारी शाळा बंद करून आपल्या घरी गेले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दि.10 फेब्रुवारीच्या सायंकाळी चार ते 11 फेब्रुवारीच्या सकाळी नऊच्या दरम्यान शाळेचे कुलुप कापून शाळेत प्रवेश मिळविला. शाळेतील शालेय पोषण आहाराचा चार क्विंटल तांदूळ किंमत आठ हजार रुपये, दोन क्विंटल मुगदाळ नऊ हजार रुपये, पाच क्विंटल हरभरा सोळा हजार रुपये आणि इतर साहित्य असा 35 हजार रुपयांचा माल चोरून नेला.
ही बाब दि. 11 फेब्रुवारी रोजी शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापक शिवानंद शिवाचार्य यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ मरखेल पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर शिवानंद शिवाचार्य यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार शेख करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻