ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आजोबाच्या मदतीने दोन मुलांनी केला वडिलांचा खून
नांदेड– जन्मदात्या पित्याला ठार करून दोन मुलांनी मृतदेह गुपचूपपणे शेतात नेऊन पुरले. आपल्या आजोबाच्या मदतीने दोन मुलांनी वडिलाचा हा खून।केल्याची घटना उमरी तालुक्यात घडली. पण गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी जेसीबीने हा मृतदेह उकरून काढला असून दोन मुलांसह आजोबाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आईला सतत त्रास देऊन मारहाण करणाऱ्या वडिलांचा पोटच्या दोन मुलांनी आजोबाच्या मदतीने खून केला. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह पोत्यात भरून शेतात पुरुन टाकला. ही घटना एका निनावी फोनमुळे उघडकीस आली. उमरी पोलिसांनी सतर्कता दाखवत जेसीबीच्या साह्याने पुरलेला मृतदेह बाहेर काढला. ही घटना 28 मेच्या रात्री उमरी तालुक्यातील हस्सा येथे घडली. घटनेमुळे उमरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उमरी तालुक्यातील हस्सा येथे मूळचा बिलोली तालुक्यातील दुगाव येथील राहणारा घरजावई संजय खंडू भंडारे (वय 38) हा मागील काही दिवसापासून सतत आपल्या पत्नीला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. यामुळे त्याची मुलं प्रदीप आणि साईनाथ त्याच्यावर राग धरून होते. त्यांनी व आईच्या वडिल नागोराव वाघमारे यांनी अनेक वेळा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद सुरूच होते.
दि. 28 मे रोजी रात्री परत संजय भंडारे हा आपल्या पत्नीला मारहाण करत असतानाच रागाच्या भरात प्रदीप आणि साईनाथ भंडारे या दोन्ही मुलांनी आजोबा नागोराव वाघमारे यांच्या मदतीने संजय भंडारे याला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब गावात कुणाला कळू नये म्हणून त्यांनी अत्यंत गोपनीयता पाळत संजय भंडारे याचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून शेतात नेला. आपल्या शेतात कापसाच्या पराठ्यांच्या ढिगाखाली पुरुन टाकला. परंतु एका निनावी फोनमुळे उमरी पोलिसांना ही बाब कळली.
पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्हे यांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देऊन घटनास्थळ गाठले. जेसीबीच्या साह्याने गाडलेला मृतदेह उकरून काढला आणि उमरी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटना घडल्यानंतर आरोपी प्रदीप भंडारे आणि साईनाथ भंडारे व त्यांचा आजोबा नागोराव वाघमारे हे तिघेजण पसार झाले आहेत. गावचे पोलीस पाटील हरी मारोतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कर्हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻