ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर व परिसरात अवैधरित्या विना परवानगी बायोडिझेल विक्री करणारी टोळी सक्रिय झाली. या टोळीवर प्रतिबंध घालावा अशी मागणी पेट्रोल पंप चालक- मालक यांनी केली होती. काही बायोडिझेल विक्रेत्यांना स्वतः जिल्हाधिकारी यांनी असे अवैध धंदे करू नका अशी समज दिली होती. परंतु तरीही या मंडळींनी आपली दुकानदारी सुरू ठेवली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह आपल्या पथकासोबत दि. 28 डिसेंबर रोजी दोन ठिकाणी बायोडिझेल अड्डयांवर कारवाई केली. यात हजारो लिटर बायोडिझेलसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड शहराच्या बाजूलाच वसलेल्या गाडेगाव रस्त्यावरील राबिका सॉ मीलजवळ ब्रह्मपुरी परिसरात बायोडिझेल ट्रकमध्ये अनधिकृतपणे भरण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन यांना मिळाली. त्यांनी या बायोडिझेलविरुद्ध महसूल प्रशासनाला सतर्क केले असून तहसीलदार किरण आंबेकर यांचे पथक आणि उपविभागीय अधिकारी विकास माने, राम बोरगावकर, वेंकटेश मुंडे या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने नांदेड ग्रामीण आणि उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाया केल्या.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईमध्ये रमेश संभाजी बनसोडे (वय 29) चालक राहणार भोपाळा तालुका नायगाव याला ताब्यात घेतले. या बायोडिझेलच्या अड्यावरून पाच हजार पन्नास लिटर बायोडिझेल, तीन ट्रक, टेम्पो, बायोडिझेल ट्रक मध्ये भरण्यात येणाऱ्या दोन मशीन असा 44 लाख 73 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाची फिर्याद मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे करत आहेत.
तर दुसऱ्या कारवाईत उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच दिवशी मारतळा ते हातणी फाटा दरम्यान सहाशे लिटर बायोडिझेल आणि एक ट्रक जप्त केला. जवळपास 35 लाख रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणीही पथकाने जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास लोहा पोलीस निरीक्षक संतोष तांबे करत आहेत.
आपल्या परिसरात अवैधरित्या बायोडिझेल किंवा कुठलाही अवैध धंदा सुरू असेल तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻