ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● इस्लापूर जिल्हा परिषद शाळेतील 1 लाख 64 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास
● कोरोना काळात शाळा बंद असताना चोरट्यांनी मारला डल्ला
नांदेड/ इस्लापूर- इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या जुन्या शाळेमधून एक लाख 64 हजार 400 रुपयाचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. येथील मुख्याध्यापक गजानन कदम पाटील व शालेय व्यवस्थापन समितीने अज्ञात चोरट्याविरुद्ध इस्लापूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
घरफोडी, रस्ता अडवून केलेली लूटमार, धारदार शस्राचा धाक दाखवून लुटणे अगदी मंदिरातील दानपेटी चोरणे अशा विविध स्वरुपाच्या चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र ज्या शाळेतून हजारो विद्यार्थी ज्ञान घेऊन आपले भवितव्य घडवितात, अशा शाळेवरील टिनपत्र्यांसह दारं- खिडक्या, टेबल- खुर्च्या असं सगळं चोरीला गेलं तर काय म्हणाल! पण असा प्रकार घडला आहे.
अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 64 हजार रुपयांचे विविध साहित्य चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार किनवट तालुक्याच्या इस्लापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडला आहे. किनवट या आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथे जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. ही शाळा गेल्या एक ते दिड वर्षापासून covid-19 संसर्गजन्य आजारामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमामुळे बंद ठेवण्यात आली होती. या शाळेच्या चार रुम ह्या जिर्ण अवस्थेत आल्या आहेत, त्यामुळे शाळेचे सर्व साहित्य शाळा बंद होण्यापूर्वी एकत्रितपणे एका रुममध्ये ठेवण्यात आले होते.
या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या शाळेच्या खोलीवर टाकलेली व खोलीमध्ये ठेवलेली 14 फूट चार इंचीची वीस टिनपत्रे (किंमत 2400), आठ लोखंडी खिडक्या (किंमत 2000), विद्यार्थी खेळणे डबलबार लोखंडी एक नग (किंमत 7000), डेस्क 15 नग (किंमत 15000), दरवाजे पाच नग (किंमत 20000), लोखंडी अर्धा गेट नग एक (किंमत 15000), लाकडी टेबल पाच नग (किंमत 10000), लाकडी राफ्टर पंचवीस नग (किंमत 25000), लाकडी जाड मोठी नाट नग 10 (किंमत 40000), लाकडी चौकटी नग 4 (किंमत 28000) अशी एकूण सर्व साहित्याची किंमत 1लाख 64 हजार चारशे रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिल्याची माहिती येथिल शाळेचे मुख्याध्यापक गजानन कदम व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुक्ष्मा संदिप वानखेडे पाटील यांनी ही माहिती दिली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻