ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुदखेड (जि. नांदेड)- ट्रॉलीसह ट्रॅक्टर नदीत कोसळल्याची दुर्घटना मुदखेड तालुक्यात घडली आहे. यात एक बाल मजूर ठार झाला असून दोन बालमजूर गंभीर जखमी झाले आहेत. मुदखेड तालुक्यातील राजवाडी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली.
मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर येथून मुदखेडकडे शेणखत टाकून मुदखेडकडे परत निघालेले ट्रॅक्टर राजवाडी नदीजवळ पुलावरून ट्रॉलीसह खाली कोसळले. या दुर्घटनेत एक बाल मजुर जागीच ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले. तेजस अशोक शिंदे (वय १५) राहणार तिरकसवाडी असे मयत बालमजुराचे नाव आहे. यातील जखमी रामेश्वर मारुती साबळे (वय १७) आणि बालाजी मारुती शिंदे (वय १८) या दोघांना नांदेड येथील विष्णुपुरीच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ही घटना सोमवार दि. २७ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी पारडी येथील नागरिकांनी धाव घेत मदत केली. जेसीबीच्या साह्याने अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. गेल्या काही दिवसांत या भागात दोन वेळा अपघात झाले आहेत. या परिसरात वळण रस्ता असल्यामुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते. आठ दिवसांपूर्वीच याच परिसरामध्ये येळी माटी पुलावरून क्रुझर गाडी गोदावरी नदीत पडून दोघांचा मृत्यू झाला होता. पुन्हा अशाच पद्धतीची घटना घडल्याने मुदखेड तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻