ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन
उदगीर (भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी ): इतिहासकारांनी सबळ पुराव्याचा आधारे न लिहिता ऐकीव माहितीवर लिखाण, तार्किक माहितीवर लिखाण केले तर ते दीर्घकालीन वादविवादाला जन्म देते. त्यामुळे अशी वादग्रस्त लिखाणं वेळीच रोखणे गरजेचे आहे. तसेच ठराविक विचारधारेची साहित्य निर्मित होत असेल तर असे साहित्य लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तीन दिवसीय ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या ‘भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी’त मोठ्या दिमाखात ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, कोकणी लेखक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, साहित्यिक श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासहित अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उदघाटनपर भाषणात खा. शरद पवार यांनी साहित्याशी निगडित विविध मुद्द्यांना हात घातला. गेल्या काही काळात संशोधनात्मक लिखाणाचा अभाव दिसून येतोय. विशेषतः ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन आणि अभ्यासाची आवश्यकता आहे. दुर्दैवाने त्याचा अभाव दिसून येतोय. इतिहासकारांनी सबळ पुराव्याचा आधारे न लिहिता ऐकीव आणि तार्किक लिखाण केले तर दीर्घकालीन वादविवादाला जन्म देतात. त्यामुळे असे लिखाण वेळीच रोखणे गरजेचे आहे. अन्यथा जनमानसात असे लिखाण ठाण मांडू शकतात अशी भीतीही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांचा अंकुश हवा, पण राजकारण्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल नको असे परखड मत त्यांनी यावेळी मांडलं. साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी न पिता परस्पर, समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते निर्माण करावे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे स्वतः सनदी अधिकारी होते. त्यामुळे शासन आणि साहित्यकातील स्नेह भाव वृद्धिंगत होईल अशा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद अशा अनेक विचारधारा जन्माला आल्या. मात्र काही ठराविक विचारधारेच्या साहित्य निर्मितीवर काही घटक भर देत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. देशात विशिष्ट प्रचार पसरविण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होतोय त्यासाठी साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातील आद्यकवी महदंबा ते जनाबाई, मुक्ताबाई, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी अशा अनेक महिला साहित्यिक होऊन गेल्या. मात्र आतापर्यंत झालेल्या ९५ साहित्य संमेलनात फक्त ०४ ते ०५ वेळेसच महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भूषविता आले. त्यामुळे महिलांचा साहित्य संमेलनाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी दर पाच साहित्य संमेलनानंतर महिला साहित्यिकाला अध्यक्ष करण्याचा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला.
साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक भाषण कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी केलं. त्यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी साहित्य संमेलनाच्या उदगीरमधील आयोजनामागचा हेतू स्पष्ट करीत आपली भूमिका विषद केली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचीही भाषणे झाली.
साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी, आपल्या भाषणात, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आपले राजकीय वजन केंद्रात खर्ची करावे अशी अपेक्षा मंचावरील नेत्यांकडून व्यक्त केली. तसेच गोवा सरकारने तसेच कोकणी साहित्यिकांनी मराठीला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी गोव्याचे लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्याकडे केली. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ठाले पाटील यांना उत्तर देत राज्यकर्त्यांचे वजन आहेच पण मराठीच्या अभिजात दर्जासाठी सोबत मिळून काम करू असे म्हटले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गोव्याचे कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी ठाले पाटील यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य न करता मराठी राजभाषेच्या मुद्द्यावर वेगळा परिसंवाद ठेवण्याची मागणी केली.
तर साहित्यिकांच्या मराठी-कोकणी वादावर पडदा टाकीत शरद पवार यांनी भाषिक वाद न घालण्याचा सल्ला कौतिकराव ठाले पाटील यांना दिला. आपण देशभर फिरतो. त्यामुळे अनेक भाषा या आपल्यासारख्या वाटतात. त्यामुळे अन्य भाषेचा तिरस्कार न करता चांगल्या गोष्टी, चांगले शब्द-उदाहरणे घेऊन शब्द मराठीला मजबूत करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी दिला. कार्यक्रमाचा शेवट हा संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर झाला.
या कार्यक्रमास शिक्षक आ. विक्रम काळे, अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील, आ. अमर राजूकर, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी खा. जनार्दन वाघमारे, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. मनोहर पटवारी, माजी आ. वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्यासह इतरही अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर राज्याच्या विविध भागातून आलेले साहित्यिक, अनेक राजकारणी, रसिक वाचक-श्रोते, शाळा-महाविद्यालातील विद्यार्थी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुषांची गर्दी होती. जवळपास साडे चार तास चाललेल्या या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक सौताडेकर, डॉ. प्रीती पोहेकर यांनी केले. तर संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तत्पूर्वी सकाळी उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संमेलस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात पारंपरिक पोशाखात शालेय विद्यार्थी, स्त्री-पुरुषांची उपस्थिती होती. या ग्रंथ दिंडीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻