ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– उद्या दिनांक 12 मार्च 2022 रोजी मनमाड ते मुदखेड या रेल्वे विद्युतीकरण कामाचे उदघाटन जालना रेल्वे स्थानकावरून करण्यात येणार आहे. मनमाड – नांदेड – मुदखेड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा सुरु आहे.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक 12 मार्च 2022 रोजी मनमाड ते मुदखेड या रेल्वे विद्युतीकरण कामाचे उदघाटन जालना रेल्वे स्थानकावरून होणार आहे.
विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेच्या इंधनात तसेच रेल्वेच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्या मनमाड ते रोटेगावपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गाला वीजपुरवठा करण्यासाठी रोटेगाव येथे 132 केव्ही सबस्टेशनची उभारणी केली जात आहे.
सध्या नांदेडहून मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेंना मनमाडपर्यंत डिझेल इंजिन लावण्यात येते. त्यासाठी प्रति किलोमीटर 15 लीटरपेक्षा जास्त इंधन खर्च होते. विद्युतीकरणामुळे हा खर्च वाचेल. तसेच मनमाड येथे सध्या डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लावले जाते. त्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. विद्युतीकरणामुळे हा वेळही वाचेल व गाडी जास्त वेळ मनमाडला थांबवण्याची गरज पडणार नाही. आता या उदघाटनानंतर मनमाड- ते मुदखेड मार्गावर प्रत्यक्ष खांब उभे करणे, विद्युत तारा उभारणे अशी विद्युतीकरणाची कामे वेगात सुरु होतील, अशी अपेक्षा आहे.
रोटेगावला विद्युत टॉवर
मनमाड ते मुदखेड रेल्वेलाइनला विजेचा पुरवठा करण्यासाठी वैजापूरजवळील रोटेगाव स्थानकावर वीज टॉवरच्या उभारणीचे काम सुरु आहे. खंडोबानगर येवला रोड, वैजापूर येथून स्वतंत्र वीजलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. वैजापूर येवला रोड, चांगदाव, नांदगावमार्गे रोटेगावात वीज आणली जाईल, असे सांगण्यात आलेले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻