ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
https://youtube.com/shorts/ZMIcfE9PIwg?feature=share
नांदेड– शहर व जिल्ह्यात भीम जयंतीचा उत्साह सर्वत्र शांततेत पार पडत असताना दि. 14 एप्रिलच्या रात्री नऊच्या सुमारास सिडको परिसरातील बळीरामपुर येथे भीम जयंती मिरवणुकीत एकाचा भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. निमित्त होते, मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्याचे! या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारेकरी आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. याच उत्साहात बळीरामपूर येथे एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. रात्री नाईक महाविद्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला.
बळीरामपूर भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाईक कॉलेजसमोर पोहचली. तेथे बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना अडथळे आणत नाचायला लागले. तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी सपासप वार केले आणि भोसकले. तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यासही चाकू मारून जखमी केले. या चाकू हल्ल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमेध वाघमारे जखमी झाला आहे. हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवरून पसार झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास जखमीच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,३४ आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम ३(२)(व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻