ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भोंदू डॉक्टरविरुद्ध नरबळी, जादूटोणा कायद्याअंतर्गत वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नांदेड– दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात कार्यरत असलेल्या एका सिनियर सेक्शन इंजिनीयरला एका भोंदू डॉक्टरने तब्बल दहा लाख 19 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात नरबळी, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी हजूर साहेब रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे कर्मचारी वसाहतमध्ये घडला.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले सीनियर सेक्शन इंजिनीअर मुरारीलाल जयराम मीना ( वय ४२) यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेला एक जण आला. त्यांना विश्वासात घेऊन त्या भोंदू डॉक्टरने तुम्हाला कोणाचा तरी श्राप लागला आहे. तो दूर करण्यासाठी तुमच्या नसांमध्ये ब्लॉकेज तयार झाले आहेत असे सांगितले. त्यासाठी त्यावर उपचार करावे लागतील, असे सांगून दोन्ही पायावर व पाठीमागे पाठीवर सर्जिकल ब्लेड मारून अघोरी पद्धतीने काहीतरी उपचार केले. त्यासाठी या भोंदू डॉक्टरने मिना यांच्याकडून दहा लाख 19 हजार रुपये उकळले. डॉक्टर नसताना देखील डॉक्टर असल्याचे भासवून मुरारीलाल मीना यांना या भोंदू डॉक्टरने फसवले आणि १० लाख १९ हजार रुपये घेऊन तो पसार झाला आहे.
त्यानंतर मुरारीलाल मीना यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी भोंदू डॉक्टरविरुद्ध फसवणूकीसह नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कलम 3(1), 3( 2) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स. पोलीस निरीक्षक प्रवीण आगलावे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻